मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – एटीएम कार्डची अदलाबदली करुन एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणार्या खातेदारांची फसवणुक करणार्या एका वॉण्टेड दुकलीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. गुफरान आबादअली खान आणि अबू ऊर्फ आदिल गुल हसन जद अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील कार आणि सात हजाराची कॅश पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवार २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
७७ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार माधवसिंग पद्मसिंग संपत हे कांदिवली येथे राहतात. ९ जानेवारीला त्यांना पैशांची गरज होती होती. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता ते त्यांच्या कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. यावेळी तिथे आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांच्याकडील एटीएम कार्ड बदलून त्यांच्या बँक खात्यात एक लाख पासष्ठ हजार रुपये काढले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच माधवसिंग संपत यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे, पोलीस निरीक्षक हरिश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन साटम, पोलीस हवालदार वामन जायभाय, पोलीस शिपाई स्वप्निल जोगलपुरे, चिरंजीवी नवलू, परमेश्वर चव्हाण, जनार्दन गवळी यांनी तपास सुरु केला होता.
एटीएम सेंटरसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तपासात या गुन्ह्यांत तिघांचा सहभाग उघडकीस आला. फसवणुकीनंतर ते तिघेही एका कारने पळून गेले होते. या कारची माहिती काढून कारच्या मालकाचा शोध सुरु केला होता. या मालकाकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी नवी मुंबईतील तळोजा येथून गुफरान खानला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्यानेच त्याचा मित्र आदिल ऊर्फ अबू गुल हसन आणि नौशाद खान आणि फुरखान यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर या पथकाने आदिलला गोवंडी येथून ताब्यात घेतले.
या दोघांकडून पोलिसांनी सात हजाराची कॅश, एक वेरना कार जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही सोमवार २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारचे मुंबई शहरात इतर गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यांची माहिती काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.