मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – केबीसीची दहा लाखांची लॉटरी लागल्याची बतावणी करुन विविध प्रोसेसिंगसाठी पैसे घेऊन एका ५८ वर्षांच्या महिलेची दोन सायबर ठगांनी फसवणुक केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही सायबर ठगाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी या महिलेकडून सात लाख चौदा हजार रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
कांदिवलीतील चारकोप, सेक्टर सातमध्ये भाविक उमेश चौहाण हा राहत असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याची सासू रुपा कमलेशभाई संघवी ही बोरिवली येथे राहते. तिला नीट ऐकता-बोलता येत नाही. १० ऑगस्ट २०२४ रोजी तिच्या मोबाईलवर एक लिंक आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर तिला केबीसीची लॉटरी लागल्याचे दिसून आले. त्यासाठी तिच्याकडे तिच्या बँक खात्यासह आधारकार्ड, पॅनकार्ड आदी माहिती विचारण्यात आली होती. ही माहिती शेअर करुन तिने त्याला दोन हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर बक्षिसाची रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी तिला सतत दोन अज्ञात व्यक्तीकडून कॉल करुन पैशांची मागणी केली जात होती. त्यामुळे २७ ऑगस्ट ते १८ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत तिने त्यांनी दिलेल्या बँक खात्यात सात लाख चौदा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही तिच्या बँक खात्यात केबीसीची दहा लाखांच्या बक्षिसाची रक्कम ट्रान्स्फर झाली नव्हती. विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिला आणखीन पैसे भरण्यास सांगत होते. तिने तिच्याकडे पैसे नसल्याचे सांगून आणखीन पैसे भरण्यास नकार दिला होता. यावेळी एका व्यक्तीने तिच्यावर कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिची मुलगी निधी आणि जावई भाविक चौहाण यांना घडलेला प्रकार सांगितला होता. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांनी तिची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तिला नीट ऐकता-बोलता येत नसल्याने तिच्या वतीने भाविक चौहाण यांनी बोरिवली पोलिसात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही सायबर ठगांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रुपा संघवी हिने ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली आहे, त्या बँक खात्याची काढली जात अहे. महेशकुमार, संजू दास, अनिलकुमार सिंग, राजेश सैनी, शिवकुमार, प्रिंस कुमार, मंगल सिंग, सर्फराज सिंग, दिनेश कुडेल, संदीप सिंग, कराज सिंग, बिट्टू कुमार, महाशा नावाच्या व्यक्तींच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली असून नंतर एटीएमद्वारे ही रक्कम काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.