फ्लॅट ट्रान्स्फरसाठी घेतलेला पैशांचा अपहार करुन फसवणुक
बारा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – फ्लॅट ट्रान्स्फरसाठी घेतलेल्या सुमारे बारा लाखांचा अपहार करुन एका व्यक्तीची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आदित्य रजनीकांत वाघेला या ठगाविरुद्ध एमएचबी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
दिनेशकुमार जयराम शाहू हा बोरिवलीतील गोराई रोड, म्हाडा कॉलनीत परिसरात राहतो. शाहू कुटुंबिय पूर्वी न्यू एमएचबी कॉलनीत राहत होते. ही इमारत पुर्नविकासासाठी गेल्यानंतर म्हाडाने त्यांना तिथे रुम दिली आहे. एक वर्षांपूर्वी त्याची आदित्य वाघेलाशी ओळख झाली होती. तो वरळी येथे राहत असून म्हाडामध्ये चांगली ओळख असल्याने त्याने त्यांना सांगितले होते. कांदिवलीतील महावीरनगरमध्ये म्हाडाच्या काही फ्लॅट आहेत. ते फ्लॅट त्याच्या नावावर ट्रान्स्फर करुन देण्याचे त्याने त्याला आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या बहिणीचे दोन्ही फ्लॅट तिथे ट्रान्स्फर करुन देण्याची विनंती केली होती. त्याचा होकार आल्यानंतर त्याने त्याला त्याच्या दोन्ही फ्लॅटचे कागदपत्रे दिली होती. याकामी त्याने त्याला टप्याटप्याने नऊ लाख दहा हजार ऑनलाईन तर तीन लाख रुपये कॅश स्वरुपात असे सुमारे बारा लाख रुपये दिले होते.
जुलै २०२४ रोजी त्याने त्याला म्हाडा कार्यालयातील जावक क्रमांकाचे एक पत्र देेऊन त्यांच्या दोन्ही फ्लॅटच्या ट्रान्स्फरचे काम सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे ते स्वत संबंधित पत्र घेऊन म्हाडा कार्यालयात शहानिशा करण्यासाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्याला त्याच्याकडील जावक पत्र बोगस असल्याचे समजले. हा प्रकार लक्षात येताच त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्याने आदित्यला घडलेला प्रकार सांगून त्याच्याकडे ट्रान्स्फरसाठी घेतलेल्या बारा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्याला पैसे परत केले नाही. नंतर त्याने त्याला प्रतिसाद देणे बंद केले, मोबाईल बंद करुन तो पळून गेला होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच दिनेशकुमारने आदित्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आदित्यविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.