त्या तरुणीवर लैगिंक अत्याचार करणारा रिक्षाचालक गजाआड
आरोपीसह गुन्ह्यांचा तपास अर्नाळा पोलिसांकडे सोपविला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – घरातून रागाने बाहेर पडलेल्या २० वर्षांच्या तरुणीला अर्नाळा येथून आणून तिच्यावर लैगिंक अत्याचार करणार्या रिक्षाचालकाला गजाआड करण्यात अखेर वनराई पोलिसांना यश आले. राजरतन सदाशिव वायवळ असे या ३२ वर्षांच्या रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्यासह या गुन्ह्यांचा तपास अर्नाळा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी राजरतन हा पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या तरुणीवर लैगिंक अत्याचार झाला की नाही याचा पोलीस तपास करत आहेत.
२० वर्षांची ही पिडीत तरुणी तिच्या आई-वडिलांसह भावडांसोबत नालासोपारा परिसरात राहते. तिचे वडिल रागीट स्वभावाचे आहेत. क्षुल्लक कारणावरुन ते सतत चिडचिड करत असल्याने ती घरातून निघून गेली होती. याच दरम्यान तिला एका रिक्षाने अर्नाळा येथे आणून तिच्यावर लैगिंक अत्याचा केला होता. त्यानंतर त्याने तिला नालासोपारा येथे सोडून पलायन केले होते. या घटनेनंतर पालकांना आपण दिवसभर कुठे होतो याबाबत काय सांगायचे या विचारात असताना ती रामंदिर रेल्वे स्थानकाजवळ आली होती. यावेळी तिची एका व्यक्तीने चौकशी केली असता तिने तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार झाल्याचे सांगितले. तिच्या गुप्त भागावर गंभीर दुखापत झाली होती. तिच्याकडे पाहून ती सांगत असलेली माहिती खरी समजून तसेच तिच्या गुप्त भागातून रक्त येत असल्याने त्याने ही माहिती पोलिसांना दिली. या माहितीनंतर वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
तिला पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये ाखल केले. तिची प्रकृती ठिक नसल्याने तिला नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच डॉक्टरांनी तिच्या शरीरातून सिझेरियनचे ब्लेड आणि दगडाचे तुकडे बाहेर काढले होते. या घटनेनंतर तिची पोलिसांनी जबानी नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ती पोलिसांना सतत विसंगत माहिती देत होती. सुरुवातीला तिने ती बनारसची रहिवाशी असून तिला गेल्याच आठवड्यात तिचे काका बनारस येथून मुंबईत आणले होते. वांद्रे टर्मिनस येथून ते काकाच्या नालासोपारा येथील घरी गेले होते. त्यानंतर तिच्यावर काही लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले.
या माहितीनंतर पोलिसांन गेल्या आठवड्याभरातील सर्व सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. मात्र वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकात ती कुठेच दिसून आली नाही. त्यानंतर तिची पोलिसांनी पुन्हा चौकशी केली असता तिच्यावर काही लोकांनी बलात्कार केल्याचे सांगितले. मात्र तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचेही काही पुरावे पोलिसांना सापडले नाही. ती सतत तिची साक्ष बदलत होती, खोटी साक्ष देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तिला दमात घेतल्यानंतर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
पालकांच्या भीतीपोटीने तिने खोटी साक्ष दिल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिला अर्नाळा घेऊन गेलेल्या अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना वनराई पोलिसांच्या एका विशेष पथकाने वालीव येथील खैरपाडा परिसरातून राजरतन वायवळ या रिक्षाचालकाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत अटक केली. या गुन्ह्यांचा तपास अर्नाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीचा ताबा संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.