चार बांगलादेशी महिलांसह पाचजणांना अटक

नागपाडा-काळाचौकी एटीएसची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जानेवारी २०२५
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या कारवाईत चार बांगलादेशी महिलांसह पाचजणांना नागपाडा आणि काळाचौकी युनिटच्या एटीएसच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आस्मा सुलतान शेख, बारशा नूरमियॉ खान, पिया दिनेश मंडल, मुसम्मतअली आजीजुल हक्क आणि समीर अहमद शब्बीर अहमद मोमीन अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील समीर हा भारतीय तर इतर चारही महिला बांगलादेशी नागरिक आहेत. अटकेनंतर या सर्वांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी तीन मोबाईल, चार सिमकार्ड, रोख रक्कम, दोन वॉलेट, दोन चाव्या, २९६ पॅनकार्डसाठी लागणारे अर्ज, लॅपटॉप, हार्डडिस्क, रबरी शिक्के आणि प्रिंटर आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

नागपाडा येथील कामाठीपुरा, अकरावी गल्लीतील आपोलो हॉटेलजवळ काही बांगलादेशी येणार असल्याची माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राठोड, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई शिरसाठ, उगले, महिला पोलीस शिपाई खेडकर, माने, गायकवाड यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता तिथे चार महिला संशयास्पदरीत्या फिरत होत्या. त्यामुळे या पथकाने चारही महिलांना ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या चारही महिलांनी त्या बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून त्या चौघीही बांगलादेशातून भारतात पळून आल्या होत्या. तेव्हापासून त्या मुंबई शहरात नोकरीनिमित्त राहत असल्याचे सांगितले. तपासात आलेल्या या माहितीनंतर या चारही महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यात बांगलादेशातून कधी आणि कशा आल्या. मुंबईसह इतर शहरात त्यांचे कोणीही नातेवाईक राहत आहे, मुंबईत येण्यामागे नक्की नोकरीचे कारण आहे का, त्यामागे इतर काही कारण आहे का. त्या बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असताना त्याना कोणीही आश्रय दिला होता का याचा पोलीस तपास करत आहेत.

अन्य एका कारवाईत काळाचौकी युनिटच्या एटीएस अधिकार्‍यांनी समीर अहमद शब्बीर अहमद मोमीन या आरोपीस अटक केली. ९ जानेवारी २०२४ रोजी कॉटनग्रीन परिसरातून पोलिसांनी काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती पोलिसांना एटीएसला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद इनायत मुल्ला, मोहम्मद नूरइस्लाम शेख, बिष्टी मोहम्मद नूरइस्लाम शेख ऊर्फ सलमा ऊर्फ साथी या तिघांना अटक केली होती. तपासात या बांगलादेशी नागरिकांना काही आरोपींनी बोगस भारतीय दस्तावेज बनवून दिल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच मेहंदी हसन सिद्धीकी आणि रामचंद्र धुरी आणि खुशबू तिवारी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत समीर मोमीनचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यानंतर त्याला शनिवारी जांभळी नाका परिसरातून एटीएसच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर समीरला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाण्यातही पाच बांगलादेशी नागरिकांना अटक
ठाण्यातही पाच बांगलादेशी नागरिकांना ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ठाण्यातील पडले, उत्तरशीव परिसरात बिगारी कामगारामध्ये काही बांगलादेशी वास्व्यास असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करणसाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद नाईक, पोलीस हवालदार प्रशांत निकुंभ, पोलीस नाईक बडगुजर, पोलीस हवालदार चालक शशिकांत सावंत यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून पाच संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशीत ते पाचजण बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध शिळ-डायधर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page