घरातील मोलकरणीनेच ५० लाखांचा मुद्देमाल पळविला

व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – लग्नासाठी बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे, हिरेजडीत दागिने आणि वीस हजार रुपयांची कॅश असा ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन घरातील मोलकरणीने पलायन केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी निलम नावाच्या ३२ वर्षांच्या मोलकरणीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला आहे. शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नरेंद्र शंकरदास मोरयानी हे ५२ वर्षाचे व्यावसायिक त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथील सेंट मार्टन रोडच्या शंतनू अपार्टमेंटमध्ये राहतात. याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर त्यांचे वयोवृद्ध आई-वडिल तर दुसर्‍या फ्लॅटमध्ये ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. आई-वडिल वयोवृद्ध असल्याने त्यांची देखभालीसाठी त्यांनी दिनू दिवाकर गौतम या तरुणाला घरगडी म्हणून ठेवले होते तर त्यांच्याकडे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून निलम नावाची एक महिला मोलकरीण म्हणून कामाला आहे. १८ जानेवारीला नातेवाईकाचा विवाह सोहळा असल्याने संपूर्ण मोरयानी कुटुंबिय राजस्थानला गेले होते. दोन दिवसांनी ते राजस्थान येथून मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी लग्नासाठी बँकेतून काढलेले सर्व सोन्याचे दागिने कपाटात सुरक्षित ठेवले होते. नंतर ते सर्व दागिने ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणार होते.

२५ जानेवारी रात्री अकरा वाजता ते आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या आईने कपाटातील सोन्याचा हार, हिरेजडीत सोन्याची बांगडी आणि कॅश मिळून येत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण कपाटाची पाहणी केली होती. यावेळी त्यांना ३० लाखांचा राजवाडी डिझाईनचा गळ्यातील हार, कानातील रिंग, २० लाखांचा हिरेजडीत सोन्याच्या बांगड्या, वीस हजार रुपयांची कॅश असा ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल दिसून आला नाही. तसेच दोन दिवसांपासून निलम ही कामावर येत नव्हती.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी निलमनेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी निलमविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. निलम ही पळून गेल्याने तिच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तिने तिचा मोबाईल बंद केला आहे. त्यामुळे तिनेच ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page