मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – कांदिवली येथे मायलेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या महिलेसह तिच्या आठ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचे तिच्या पतीला कामावरुन आल्यानंतर दिसून आले. मुलाची हत्या करुन महिलेने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांमध्ये पुष्पा शिवशंकर दत्ता (३६) हिच्यासह तिच्या आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर काही गोष्टींचा उलघडा होईल असे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी सांगितले.
ही घटना सोमवारी २७ जानेवारी सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा वाजता कांदिवीतील नरसीपाडा, डिलक्स हॉटेलमागील सरस्वती चाळीत घडली. याच चाळीत गेल्या एक वर्षांपासून शिवशंकर सुखेदू दत्ता हा त्याची पत्नी पुष्पा आणि आठ वर्षांच्या मुलासोबत राहतो. शिवशंकर आणि पुष्पा यांच्यातील संबंध फारसे चांगले नव्हते. त्यातच पुष्पाही स्थानिक लोकांशी जास्त बोलत नव्हती. शिवशंकर हा टेम्पोचालक तर त्याची पत्नी गृहिणी आहे. तिचा मुलगा याच परिसरातील एका शाळेत दुसरीत शिकत होता. सोमवारी सकाळी साडेसात वाजता शिवशंकर हा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. यावेळी घरात त्याची पत्नी आणि मुलगा होता.
दुपारी साडेबारा वाजता तो कामावरुन घरी आला होता. मात्र दार ठोठावून पुष्पाने दरवाजा उघडला नाही. बराच वेळ होऊन तिने दरवाजा न उघडल्याने त्याला संशय आला होता. त्यामुळे त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी त्याला त्याच्या पत्नीसह मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या दोघांनाही गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दोघांना कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद केली होती.
प्राथमिक तपासात पुष्पाने आधीच तिच्या आठ वर्षांच्या मुलाला गळफास लावून त्याची हत्या केली आणि नंतर स्वतला गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच या घटनेबाबत शिवशंकर दत्ता याच्यावरही पोलिसांचा संशय आहे. त्यानेच या दोघांची हत्या करुन घरातून पलायन केले आणि दुपारी येऊन त्यांनी आत्महत्येचा बनाव केला हा या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहे.
या घटनेनंतर शिवशंकर गुप्ता याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. कौटुंबिक वाद किंवा आर्थिक कारणावरुन हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान सोमवारी दुपारी उघडकीस आलेल्या दुहेरी आत्महत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.