शारीरिक संबंधाची मागणी करुन ८० लाखांच्या खंडणीची मागणी
व्यावसायिक पती-पत्नीला धमकाविणार्या आरोपीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – पत्नीसह मैत्रिणीसोबत अश्लील फोटो आणि व्हिडीओ नातेवाईकासह कार्यालयातील ग्रुपमध्ये व्हायरल करण्याची धमकी देऊन एका व्यावसायिकाकडे त्याच्याच मित्राने ८० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पवई परिसरात उघडकीस आला आहे. व्यावसायिक पती-पत्नीला ब्लॅकमेल करुन धमकी दिल्याप्रकरणी रॉल परेरा या आरोपीविरुद्ध पवई पोलिसांनी खंडणीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास डी. एन नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत जॉनची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४० वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत पवई परिसरात राहतात. रॉल परेरा हा त्यांचा मित्र असून त्यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये तक्रारदार व्यावसायिकाचे पत्नीसह त्याच्या मैत्रिणीसोबतचे काही खाजगी अश्लील फोटो आणि व्हिडीओ होते. ते फोटोसह व्हिडीओने रॉलने त्यांच्या पत्नीला दाखविले होते. ते व्हिडीओ दाखवून त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केले होते. त्याने तिच्यासोबत शाररिक संबंधाची मागणी केली होती. तसेच ८० लाखांची मागणी केली होती. त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही किंवा ऐंशी लाख रुपये दिले नाहीतर त्यांच्यातील अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या नातेवाईकांच्या, त्यांच्या कंपनीच्या अधिकृत ग्रुपमध्ये व्हायरल करुन त्यांची बदनामीची धमकी दिली होती. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली होती.
आरोपी रॉल हा सतत व्हॉटअप कॉलवरुन त्यांच्याकडे ८० लाखांच्या खंडणीसाठी धमकी देत होता. सतत खंडणीसाठी येणार्या धमकीसह रॉलकडून अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीने त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रॉल परेराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे, अश्लील फोटोसह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा संपूर्ण गुन्हा अंधेरीतील चारबंगला, एन दत्ता मार्ग, गार्डन रोड परिसरात घडल्याने त्याचा तपास डी. एन नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे सांगितले. याच गुन्ह्यांत रॉल परेराची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.