इलेक्ट्रीक मीटरवरुन ६२ वर्षांच्या वयोवृद्धावर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत वयोवृद्ध आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – इलेक्ट्रीक मीटर बसविण्यावरुन झालेल्या वादातून एका वयोवृद्धावर त्याच्याच शेजारी राहणार्या वयोवृद्धाने लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात शिरीष शंकर पाठारे हे ६५ वर्षांचे वयोवृद्ध जखमी झाले असून त्यांच्यावर तरुण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच ६२ वर्षांचा आरोपी वयोवृद्ध चंद्रेश जोग याला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
ही घटना शनिवारी २५ जानेवारीला दुपारी सव्वाच्या सुमारास दहिसर येथील संतोषी माता रोड, पाठारेवाडी, शिवम सदनमध्ये घडली. याच शिवम सदनमध्ये शिरीष पाठारे आणि चंद्रेश जोग हे शेजारी राहतात. ते दोघेही एकमेकांच्या चांगल्या परिचित आहेत. शिरीष यांनी त्यांच्या राहत्या घरी इलेक्ट्रीक मीटर लावत होते. त्याला चंद्रेशचा विरोध होता. या कारणावरुन काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होता. शनिवारी दुपारी पाऊणच्या सुमारास इलेक्ट्रीक मीटर लावण्याच्या वादातून त्यांच्यात भांडण झाले होते. या भांडणानंतर रागाच्या भरात चंद्रेशने शिरीष यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. डोक्याला दुखापत झाल्याने ते जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या तरुण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ही माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शिरीष पाठारे यांच्या जबानीवरुन पोलिसांनी चंद्रेशविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.