३८ लाखांच्या हिर्यांच्या चोरीप्रकरणी दोन शिपायांना अटक
पत्नीच्या उपचारासाठी हिर्यांची चोरी केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – सुमारे ३८ लाखांच्या हिर्यांच्या चोरीप्रकरणी एका हिरे व्यावसायिकाच्या कार्यालयातील दोन शिपायांना बीकेसी पोलिसांनी अटक केली. संजय भागोजी बडबे आणि सुधीर सुदाम कडू अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून चोरीचे हिरे लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान संजय बडवे याने पत्नीच्या मोतीबिंदूच्या उपचारासाठी हिर्यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
निकेश रसीकलाल शाह हे हिरे व्यावसायिक असून सांताक्रुज परिसरात राहतात. त्यांचा वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये स्पार्कलिंग स्टार नावाची एक हिरे खरेदी-विक्रीची कंपनी आहे. याच कंपनीत संजय बडबे आणि सुधीर कडू हे दोघेही शिपाई म्हणून कामाला होते. कार्यालयातील सफाई करणे, हिर्यांचे पॅकेटची देवाण-घेवाण करे, वेगवेगळ्या केबीरमध्ये हिरे व्यवस्थित ठेवणे आदी कामाची जबाबदारी दोघांवर होती. २१ जानेवारीला त्यांच्या कार्यालयातील कामकाज नेहमीप्रमाणे सुरु झाले होते. रात्री उशिरा त्यांनी हिर्यांच्या स्टॉकची तपासणी केली असता त्यात त्यांना काही हिरे कमी असल्याचे दिसून आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात त्यांना कंपनीचा शिपाई संजय बडबे हा सेल्स केबीनमध्ये साफसफाई करण्याचा बहाणा करुन हातचलाखीने काही हिरे काढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दुसर्या दिवशी संबंधित फुटेज दाखवून त्याच्याकडे निकेश शाह यांनी चौकशी केली होती. यावेळी त्याने पत्नीच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने हिरे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच १४ जानेवारीला सुधीर कडू यानेही काही हिरे चोरी केल्यचे सांगितले. तपासात या दोघांनी १४ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत३८ लाख ५२ हजार रुपयांचे ३२१ कॅरेट कट ऍण्ड पॉलिश हिरे चोरी केल्याचे उघडकीस आले.
या प्रकारानंतर या दोघांनाही घेऊन निकेश शाह हे बीकेसी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून त्यांनी दोन्ही शिपायाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी गंभीर दखल घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर संजय बडबे आणि सुधीर कडू यांच्याविरुद्ध हिर्यांच्या चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची चौकशी सुरु असून त्यांच्याकडून लवकरच चोरीचे सर्व हिरे हस्तगत केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.