फ्रिंगरप्रिंटचा अहवाल अद्याप आलाच नाही- परमजीतसिंह दहिया
शरीफुलविरुद्ध पोलिसांकडे भक्कम पुरावा असल्याचा दावा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जानेवारी २०२५
मुंबई, – सिनेअभिनेता सैफअली खान याच्या फ्लॅटमध्ये सापडलेले आणि आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याचा फिंगरप्रिंट मॅच झाला नसल्याचे काही वृत्त प्रसिद्ध झाले आहे, मात्र या वृत्ताचे अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया यांनी खंडन करताना फिंगरप्रिंटचा अहवाल अद्याच आलाच नसल्याचे सांगितले. दरम्यान शरीफुलविरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचा दावाही यावेळी दहिया यांनी पत्रकाराशी बोलताना केला.
सिनेअभिनेता सैफअली खान याच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या शरीफुलने चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर सैफवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पळून गेलेल्या शरीफुलला चार दिवसांनी ठाण्यातून पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील चाकू हस्तगत केला होता. सैफअलीच्या फ्लॅटसह चाकूचे हाताचे ठसे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यातच त्याच्या फिंगरप्रिंट जुळले नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यात पोलिसांकडून याबाबत अधिकृतपणे कोणीही काहीही बोलत नव्हते. त्यामुळे या तपासाबाबत अनेक तर्क-वितर्क वर्तविले जात होते. मात्र परमजीतसिंग दहिया यांनी या वृत्ताचे खंडन करताना अद्याप फिंगरप्रिंटचा अहवाल आला नाही असे सांगितले.
शरीफुल हा बांगलादेशी असून त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांना सापडे आहे. बांगलादेशातून आल्यानंतर तो काही दिवस कोलकाता येथे वास्तव्यास होता. तिथे त्याला कोणी मदत केली याची माहिती प्राप्त होताच वांद्रे पोलिसांची एक टिम कोलकाता येथे गेली होती. यावेळी काही लोकांच्या पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संमातर तपास केला असून आमचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने चांगले काम केले असेही त्यांनी सांगितले. मोहम्मद शरीफुलचा फिंगरप्रिटचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नसून या अहवालाची पोलीस प्रतिक्षा करत आहेत.
या गुन्ह्यांत इतर कुठल्या आरोपीचा सहभाग उघडकीस आला नाही. त्या पहाटे शरीफुल हा २ वाजून ४७ मिनिटांनी आला होता. हल्ल्यानंतर सैफअली हा हॉस्पिटलमध्ये गेला होता. याबाबतचे सर्व सीसीटिव्ही फुटेज पोलिसांकडे आहेत. तसेच सैफअलीवर हल्ला झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांना लिलावती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली होती. ती माहिती खान कुटुंबियांनी दिली नाही असेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत शरीफुलविरुद्ध अनेक वृत्त प्रसिद्ध होत होते. याबाबत पोलिसांकडून अधिकृतपणे खुलासा झाला नव्हता. त्यामुळे यावेळेस पहिल्यांदा अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया यांनी पत्रकार परिषद बोलावून या तपासाची माहिती पत्रकारांना सांगितली होती.