भांडुपमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

दलालास अटक तर दोन तरुणींची सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जानेवारी २०२५
मुंबई, – भांडुप येथे चालणार्‍या एका सेक्स रॅकेटचा भांडुप पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी शिरीषकुमार नावाच्या एका दलालास पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली असून या दोघींनाही नंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. शिरीषकुमारविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिरीषकुमार हा भांडुप परिसरात राहत असून काही तरुणींच्या संपर्कात आहे. या तरुणींच्या मदतीने तो सेक्स रॅकेट चालवतो. ग्राहकांच्या मागणीनुसार काही तरुणींना त्यांच्यासोबत वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्याची शहानिशा करण्यासाठी बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याला संपर्क साधला होता. त्याच्याकडे काही तरुणींची मागणी करुन त्याने त्याच्याकडे काही तरुणींची फोटोची मागणी केली होती. त्यानंतर त्याने त्याला चार तरुणींचे फोटो पाठविले होते. चारही महिलांसाठी शिरीषकुमारने बोगस ग्राहकाकडे वीस हजारासह रुमसाठी दहा हजाराची मागणी केली होती. फोनवरच सौदा पक्का झाल्यानंतर ग्राहकाने त्याला मंगतराम पेट्रोलपंपाजवळ बोलाविले होते.

मंगळवारी दुपारी तीन वाजता शिरीषकुमार हा दोन तरुणींसोबत तिथे आला होता. तेथून ते सर्वजण एका रुममध्ये गेले होते. तिथे त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असताना पोलीस निरीक्षक महेश महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढे, पोलीस हवालदार माळी, गोरुड, पोलीस शिपाई शिंदे, गोडसे, महिला हवालदार तिवारी, महिला पोलीस शिपाई निकम यांनी तिथे छापा टाकला होता. यावेळी शिरीषकुमारला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या तावडीतून दोन्ही तरुणींची सुटका केली. या दोघींच्या चौकशीत शिरीषकुमार हा त्यांना ग्राहकासोबत वेश्यव्यवसायासाठी पाठवत असल्याचे सांगितले. त्यांना चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून त्याने दोघींनाही वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले होते.

त्यातील एका तरुणीचे वडिल नसून लहान बहिण आहे. दुसर्‍या तरुणीचा पती दारुडा असून तो काहीच कामधंदा करत नाही. त्यामुळे त्या दोघीही शिरीषकुमारसाठी काम करत असल्याचे सांगितले. या दोघीना ग्राहकांसोबत जाण्यासाठी पाच हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन तो भांडुप परिसरात सेक्स रॅकेट चालवत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी शिरीषकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन मोबाईल, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ४ हजार २५० रुपयांची कॅश जप्त केली आहे. मेडीकलनंतर दोन्ही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page