प्रेमाला विरोध करुन आईनेच मुलीचा गळा आवळून संपविले
वांद्रे येथील धक्कादायक घटना; हत्येच्या गुन्ह्यांत आईला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ मार्च २०२४
मुंबई, – कॉलेजमध्ये शिकणार्या मुलीचे एका तरुणासोबत असलेले प्रेमसंबंध आणि त्यातून मुलीच्या वाईट संगतीमुळे सतत होणार्या भांडणातून एका महिलेने तिच्याच भूमिका उमेश बागडी या १९ वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. या हत्येनंतर भयभीत झालेल्या या महिलेने मुलीला आकडी आल्याने ती बेशुद्ध झाल्याचा बनाव केला, मात्र शवविच्छेदन अहवालात ही हत्या असल्याचे उघडकीस येताच आरोपी आई टिना उमेश बागडी हिला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजता वांद्रे येथील शितला माता, प्लॉट क्रमांक ऐंशी, नथू गणपत चाळीत घडली. याच चाळीत टिना ही तिची मुलगी भूमिकासोबत राहत होती. भूमिका ही वांद्रे येथील चेतना कॉलेजमध्ये शिकत होती. तिथेच तिची ओळख राहुल नावाच्या एका तरुणासोबत झाली होती. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती अलीकडेच टिनाला समजली होती. तिचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यातच तिला भूमिका ही वाईट मार्गाला जात असल्याचे दिसून आल्याने ती तिची नेहमी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ती समजण्याचा प्रयत्न करत नसल्याने त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. सोमवारी पहाटे तीन वाजता भूमिका झोपेतून उठली होती. काही वेळानंतर टिनाला जाग आली. यावेळी त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात भूमिकाने टिनाच्या बोटाचा चावा घेऊन तिला गंभीर दुखापत केली होती. त्याचा राग आल्याने तिने तिची गळा आवळला. त्यात ती बेशुद्ध झाली. या घटनेनंतर ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिथेच राहणार्या तिच्या भावाला सांगितला. तो घरी आल्यानंतर या दोघांनीही तिला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
रुग्णालयातून ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी टिनाची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत टिनाने भूमिकाला अचानक आकडी आली आणि ती बेशुद्ध झाली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात आणण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचा बनाव केला. या जबानीनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला. त्यात भूमिकाचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे नमूद केले होते. त्यामुळे टिनाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
या चौकशीदरम्यान तिने घडलेला प्रकार सांगून भांडणात तिने भूमिकाची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. तिच्या कबुलीनंतर निर्मलनगर पोलिसांनी टिना बागडीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांनी दुजोरा देताना महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील या गुन्ह्यांचा तपास करत असल्याचे सांगितले.