सेशन कोर्टातून पोक्सोच्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न
आरोपीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीने विशेष सेशन कोर्टातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे उपस्थित पोलिसांनी आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडला. कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रसाद सुरेश शिलीमकर या ३५ वर्षांच्या आरोपीविरुद्ध कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत कोर्टाच्या आदेशानंतर अटक करुन त्याची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२०२३ साली समतानगर पोलीस ठाण्यात प्रसाद शिलीमकर या आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी बुधवारी दुपारी त्याला कुलाबा येथील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्ट रुम ३३ समोरील पॅसेजमध्ये त्याला उभे करण्यात आले होते. तिथे असताना त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेने तिथे उपस्थित पोलिसांसह इतर आरोपींमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच कुलाबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी महिला पोलीस शिपाई प्रियांका दशरथ ढेंबरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रसाद शिलीमकर याच्याविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.