मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – तायकांदो प्रशिक्षकावर प्राणघातक हल्ला करुन पळून गेलेल्या तिघांनाही अवघ्या २४ तासांत शिवजी पार्क पोलिसांनी अटक केली. मनजोतसिंग तेजींदरसिंग, इम्रान नूरमोहम्मद शेख आणि मनिष राजेश विग अशी या तिघांची नावे असून ते तिघेही सायन-कोळीवाड्यातील रहिवाशी आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने सोमवार ३ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मनजोतसिंग आणि इम्रान हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर यांनी सांगितले.
तायकांदो प्रशिक्षक असलेले राजेश मुक्ताजी खिलारी हे दादर परिसरात राहतात. बुधवारी २९ जानेवारीला दादर येथील वीर सावरकर रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळील प्रवेशाद्वारासमोर त्यांचे काही तरुणांशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून त्यांच्यावर या तिघांनी चाकूसह बॅटने प्राणघातक हल्ला केला होात. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी राजेश खिलारी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून तिन्ही हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या हल्ल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सरनोबत, पोलीस उपनिरीक्षक योगेश राणे व अन्य पोलीस पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी २४ तासांत तिन्ही हल्लेखोरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा हल्ला केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर तिघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मनजोतसिंग आणि इम्रान हे दोघेही गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्याविरुद्ध शरीराविरुद्ध आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक सानप हे करीत आहेत.