दिवसाढवळ्या घरफोडी करणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

तीन आरोपीसह व्यापार्‍याला अटक; मुंबईसह गुजरात, बंगलोरमध्ये गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मार्च २०२४
मुंबई, – दिवसाढवळ्या घरफोडी करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश करुन तीन मुख्य आरोपीसह एका ज्वेलर्स व्यापार्‍याला अटक केली. या आरोपींकडून चोरीचे दागिन्यासह घरफोडीसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. मोहममद शाबेज दुलारे खान, अमीत राजेंद्र यादव ऊर्फ बाबू, देवराम मुकरराम चौधरी आणि मुकेश बसंतीलाल मेहता अशी या चौघांची नावे आहेत. यातील मुकेश मेहता हा चोरीचा माल विकत घेणारा व्यापारी आहेत. घरफोडी करणारी ही आंतरराज्य टोळी असून आरोपीविरुद्ध मुंबईसह गुजरात, बंगलोर शहरात अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांनी सांगितले.

यातील तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून ते मालाड येथील काचपाडा, रामचंद्र लेनवरील एका निवासी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. ४ मार्चला ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कारखान्यात निघून गेले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. ही संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटातील कॅश, सोन्याचे तसेच हिरेजडीत दागिने असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. सायंकाळी तक्रारदार घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी मालाड पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी व्यापार्‍याच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या घटनेची अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, तुषार सुखदेवे, दिपक पोवार, पोलीस हवालदार राजेश तोंडवळकर, संतोष सातवसे, जयदीप जुवाटकर, अमीत गावड, जॉन फर्नाडिस, पोलीस शिपाई स्वप्नील काटे, महेश डोईफोडे, मंदार गोंजारी, सचिन गायकवाड, रामचंद्र महाडिक, समाधान वाघ, दलित पाईकराव, आदित्य राणे यांनी तपासाला सुरुवात केली होती. सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी डोबिवली येथील सोनारपाडा, गोलिवली गावात लपले असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे चार दिवस पाळत ठेवली होती. या परिसरातील जंगलसदृश भागात रात्रभर सतर्कपणे पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद शाबेज खान, अमीत यादव आणि देवराम चोधरी या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली करुन डोबिवलीत आश्रय घेतल्याचे सांगितले. त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहित्य, कॅश, सोन्याचे आणि हिर्‍याचे दागिने असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात आणि बंगलोर शहरात अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. ही टोळी दिवसाढवळ्या घरफोडी करुन पलायन करत होती. मोहम्मद शाबेजविरुद्ध मुंबईतील चारकोप, नवघर पोलीस इाण्यात, अमीत यादवविरुद्ध वाकोला, आरे, नालासोपारा, तुळीजसह गुजरातच्या विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्हे दाखल आहेत. देवाराम चौधरीविरुद्ध बंगलोर शहरात दोन गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या चौकशीत चोरीचे दागिने त्यांनी मुकेश मेहता या ज्वेलर्स व्यापार्‍याला विकल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला रविवारी १० मार्चला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने घरफोडीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page