साडेसात कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्य आरोपी आयपीएस अधिकार्‍याचा पती असल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – गुजरातच्या सुरत शहरातील टेक्सटाईल्स व्यावसायिकाची सुमारे साडेसात कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कोट्यातील भूखंड-सदनिका, पुणे-ठाणे महानगरपालिकेचे डेव्हल्पेमेंट सर्टिफिकेटस, नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये टी-शर्ट आणि हुडी पुरविण्याचे बोगस कंत्राटाचे दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा या तिघांवर आरोप आहे. पुरुषोत्तम प्रभाकर चव्हाण, नारायण सावंत आणि यशवंत पवार अशी या तिघांची नावे असून यातील पुरुषोत्तम चव्हाण हा एका आयपीएस अधिकार्‍याचा पती आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी त्याला २६३ कोटीच्या टीडीएस घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध वीस ते पंचवीस बड्या लोकांनी पोलिसांत तक्रार केल्याचे बोलले जाते.

रावसाहेब अनंत देसाई हे मूळचे गुजरातच्या सुरतचे रहिवाशी आहेत. सुरत शहरात त्यांचा टेक्सटाईल्सचा मोठा व्यवसाय आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांची पुरुषोत्तम चव्हाणशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने त्यांना शासकीय कोट्यातून कमी किंमतीत भूखंड तसेच सदनिका देण्याचे आश्‍वासन दिले होते. पुणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या डेव्हल्पमेंट राईट सर्टिफिकेट तसेच नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये टी शर्ट आणि हुडी पुरविण्याचे कंत्राट मिळवून देतो असेही सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनीही त्याला मदत करण्याची विनंती केली होती. याच कामासाठी त्याने त्यांच्याकडून मार्च २०१५ ते एप्रिल २०२४ या कालावधीत टप्याटप्याने ७ कोटी ४२ लाख रुपये घेतले होते. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने भूखंड खरेदीचा तसेच एमपीए नाशिक येथील टी शर्ट आणि हुडीचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाल्याचे दस्तावेज दिले होते.

इतकेच नव्हे तर नारायण सावंत आणि यशवंत पवार याच्या मदतीने ठाण्यातील मुद्रांक नोंदणी कार्यालयात शासकीय कोट्यातून भूखंड-सदनिका मिळाल्याचे नोंदणी करुन त्याचे दस्तावेज दिले होते. मात्र या दस्तावेजाची शहानिशा केल्यानंतर ते सर्वजण दस्तावेज बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. हा प्रकार उघडकीस त्यांनी पुरुषोत्तम चव्हाण याच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्याने विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे रावसाहेब देसाई यांनी कुलाबा पोलिसांसह आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पुरुषोत्तम चव्हाण, नारायण सावंत, यशवंत पवार यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस शासकीय दस्तावेज बनवून ७ कोटी ४२ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

यातील पुरुषोत्तम हा कुलाबा येथील शासकीय निवासस्थानी राहत असून त्याची पत्नी महाराष्ट्र पोलीस दलात आयपीएस अधिकारी आहे. तो व्यावसायिक असून त्याने अशाच प्रकारे आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याला यापूर्वीही ईडीने २६३ कोटीच्या टीडीएस घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. यावेळी त्याच्या शासकीय निवासस्थानी छापा टाकल्यानंतर ईडीच्या अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेज सापडले होते. या दस्तावेजाची पाहणी केल्यानंतर त्याने अनेकांना शासकीय कोट्यातून भूखंड-सदनिका, पुणे-ठाणे मनपाच्या डेव्हल्पमेंट सर्टिफिकेट तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमीसाठी टी-शर्ट व हुडी पुरविण्याचे कंत्राट देतो देण्याच्या आमिषाने गंडा घातल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी काही तक्रारी प्राप्त होताच त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page