६३ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश

चोरीच्या उद्देशाने हत्या करणार्‍या नोकराला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मार्च २०२४
मुंबई, – मलबार हिल येथे राहणार्‍या ज्योती मुकेश शाह या ६३ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात मलबार हिल पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर घरातील सोन्याचे दागिने चोरी करुन पळून गेलेल्या कन्हैयाकुमार पंडित या २० वर्षांच्या बिहारी नोकराला भुसावळ येथून मलबार हिल पोलिसांनी अटक केली. चोरीच्या उद्देशाने त्याने ज्योती शाह यांची हत्या केल्याची कबुली दिली असून हत्येनंतर तो बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.

ही घटना मंगळवारी सायंकाळी मलबार हिल येथील नेपीयन्सी रोड, ताहनी हाईट्स गृहनिर्माण सोसायटीच्या सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली. याच अपार्टमेंटच्या विसाव्या मजल्यावरील पाच बीएचके फ्लॅटमध्ये मुकेश शाह हे त्यांची पत्नी ज्योतीसोबत राहतात. त्यांना एक विवाहीत मुलगी असून ती तिच्या सासरी राहते. ते दोघेही वयोवृद्ध असल्याने त्यांनी एका तरुणीला घरकामासाठी ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांनी कन्हैयाकुमार पंडितला घरकामासाठी ठेवले होते. त्याच्यावर मार्केटमधून सामान आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दिवसभर काम करुन तो त्यांच्यासोबत राहत होता. मुकेश शाह हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचे शोरुम आहे.

मंगळवारी मुकेश हे नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. यावेळी घरात त्यांची पत्नी एकटीच होती. दुपारी त्यांनी ज्योतीला फोन केला होता. मात्र वारंवार कॉल करुनही तिने प्रतिसाद दिला नाही. सायंकाळी ते कामावरुन घरी आले होते. यावेळी त्यांना ज्योती ही बेडरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडली होती. तिची काहीच हालचाल नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मलबार हिल पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ज्योती यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर ज्योती शाह यांची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले. या अहवालानंतर मुकेश शाह यांची जबानी नोंदवून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला होता.

प्राथमिक तपासात त्यांच्या घरी काम करणारा कन्हैयाकुमार पंडित हा हत्येनंतर घरातून पळून गेला होता. घरातील काही वस्तू चोरीस गेली का याचा तपास करताना ज्योती शाह यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे कन्हैयाने चोरीच्या उद्देशानेच ही हत्या करुन पलायन केल्याचा पोलिसांचा संशय होता. तो मूळचा बिहारच्या सितामढीचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन कन्हैयाला बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे मलबार हिल पोलिसांनी भुसावळ रेल्वे पोलिसांना संपर्क साधून त्यांची मदत घेतली होती. ही ट्रेन भुसावळ येथे येताच कन्हैयाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याचा ताबा मलबार हिल पोलिसांना देण्यात आला होता. चौकशीदरम्यान त्यानेच ही हत्या चोरीच्या उद्देशाने केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला चोरीसह हत्येच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे सर्व दागिने जप्त केले आहेत. कन्हैयाचे वडिल याच परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून ही माहिती समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page