मोबाईल-सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक
आरोपीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल; चोरीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मोबाईल-सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीस कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. अभय राममनोहर दुबे असे या २२ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईल आणि सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केला आहे. अभय हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचविरुद्ध काही गंभीर गुन्ह्यांत चॅप्टर केस दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१८ वर्षांची तक्रारदार तरुणी ही बोरिवली परिसरात राहते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ती देवीपाडा बसवे येथून पायी जात होती. यावेळी अभयसह त्याच्या सहकार्याने तिच्याजवळ आले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी तिला माहरण करुन तिच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईल घेऊन पलायन केले. घडलेला प्रकार तिने कस्तुरबा मार्ग पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
या तक्रारीची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, महेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धीरज वायकोस, पोलीस हवालदार राजेश पेडणेकर, मनोज परीट, पोलीस शिपाई अजिंक्य अहिरे, अमोल फोपसे यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पळून गेलेल्या अभय दुबे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच त्याच्या मित्राच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील सोनसाखळी आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत आरोपीस चोरीच्या मुद्देमालासह अटक करणार्या सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धीरज वायकोस, पोलीस हवालदार राजेश पेडणेकर, मनोज परीट, पोलीस शिपाई अजिंक्य अहिरे, अमोल फोपसे या पोलीस पथकाचे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी कौतुक केले होते.