मित्राला भेटण्याचा जाब विचारला म्हणून पतीवर पत्नीकडून हल्ला
पतीवर उपचार सुरु तर पत्नीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मित्राला भेटण्याचा जाब विचारला म्हणून पतीवर पत्नीने चाकूने हल्ला केल्याची घटना ऍण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात आरमोगम मोगन नाडर हा ३८ वर्षीय पती गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. या्रपकरणी आरोपी पत्नी देवा आरमोगम नाडर हिच्याविरुद्ध ऍण्टॉप हिल पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता ऍण्टॉप हिल येथील रावजी गनत्र मार्ग, सेक्टर तीन, सीजीएम कॉलनीत घडली. याच ठिकाणी आरमोगम हा राहत असून तो कॅटरिंगचे काम करतो. देवा ही त्याची पत्नी असून तिचा सुनिल गुलित नावाचा एक मित्र आहे. ती सुनिलला नेहमीच भेटायला जात असल्याची माहिती त्याला समजली होती. त्यामुळे त्याने तिला जाब विचारला होता. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी रागाच्या भरात तिने आरमोगम याला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्याकडील चाकूने वार केले होते. त्यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर तिथे उपचार सुरु करण्यात आले होते.
ही माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेनंतर आरमोगम याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस येताच त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पत्नी देवा नाडर हिच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. हल्ल्यानंतर ती पळून गेल्याने तिचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.