मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – व्यावसायिक गाळ्यासाठी घेतलेल्या सुमारे वीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी स्पिनिंग वर्ल्ड इंटरपप्रायजेस कंपनीचा मालक इरफान शेख याच्याविरुद्ध डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये गाळा देण्याचा बहाणा करुन इरफानने ही फसवणुक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
खलीकुर रेहमान अब्दुल करीम सलमानी हे ६५ वर्षांचे वयोवृद्ध घाटकोपर परिसरात राहत असून त्यांचा स्वतचा एक सलून शॉप आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी एक व्यावसायिक गाळ्याची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असताना त्यांची पंधरा वर्षांपूर्वी इरफान शेखशी ओळख झाली होती. इरफानची एक बांधकाम कंपनी असून त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरु होते. या भेटीदरम्यान त्याने त्यांना महालक्ष्मी रेसकोर्स, दुधवाला कॉम्प्लेक्स आणि सातरस्ता येथील के के मार्गावरील तीन प्रोजेक्टची माहिती दिली होती. त्यापैकी एका प्रोजेक्टमध्ये त्यांना स्वस्तात ५०० चौ. फुटाचा व्यावसायिक गाळा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला याच गाळ्यासाठी नोव्हेंबर २०१० ते फेब्रुवारी २०१२ या कालावधीत टप्याटप्याने वीस लाख रुपये दिले होते.
मात्र तेरा वर्ष उलटूनही त्याने त्यांना व्यावसायिक गाळ्याचा ताबा दिला नाही किंवा गाळ्याचे कागदपत्रे दिली नव्हती. वारंवार मागणी करुनही तो त्यांना टाळत होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे परत न करता या पैशांचा परस्पर वैयक्तिक फायद्यासाठी अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी इरफान शेखविरुद्ध डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.