मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सात महिलांसह आठ बांगलादेशी नागरिकांना घाटकोपर, साकिनाका आणि नागपाडा पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. अब्दुल कादर नूर इस्लाम बिशेस, मुन्नी रहिम गाजी, सुमैया मोहम्मद शेख, जमीना हजरतअली मंडल, साजेदा सादेकअली मुल्ला, मिताली रफिक शेख, रहिमाबेगम अली मुल्ला आणि मुमताजबेगम अब्दुल हसन गाझी अशी या आठजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या दोन दिवसांत नागपाडा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत चार बांगलादेशी महिलांना अटक केली. नागपाडा येथील कामाठीपुरा परिसरात काही बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना साजेदा मुल्ला आणि मिताली शेख या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्या दोघीही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. नोकरीच्या शोधासाठी त्या दोघीही नागपाडा परिसरात आल्या होत्या. दुसर्या कारवाई याच पथकाने मुमताजबेगम आणि रहिमाबेगम या दोन महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी त्या बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. त्या दोघीही कामाठीपुरा परिसरात राहत होत्या. बांगलादेशातून पळून आल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून त्या दोघीही मुंबई शहरात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राठोड, पोलीस उपनिरीक्षक खैरावकर, पोलीस हवालदार चव्हाण, सपाटे, बुगले, पोलीस शिपाई उगले, भावसार, घोरे, जाधव, डेडवाल, पाटील, माने, महिला पोलीस शिपाई शेलार यांनी केली.
अशीच दुसरी कारवाई साकिनाका पोलिसांनी केली. साकिनाका परिसरात काही बांगलादेशी नागरिकांचे वास्व्य असल्याची माहिती साकिनाका पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, पोलीस हवालदार बाठे, गायकर, कानडे, पोलीस शिपाई गवारे, आहेर, महिला पोलीस शिपाई चव्हाण यांी शनिवारी साकिनाका येथील मोहिली पाईनलाईन येथून मुन्नी गाजी या २९ वर्षीय महिलेस अटक केली. तपासात ही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. गोरेगाव येथील बांगुरनगर परिसरात ती राहत असून गेल्या सहा वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होती. दुसर्या कारवाईत याच पथकाने साकिनाका येथील खैरानी रोड, यादवनगर परिसरातून सुमैया शेख या महिलेस अटक केली. ती गोरेगाव येथील शिवशाही सहकारी सोसायटी राहत असून गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबई शहरात राहत होती.
घाटकोपर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक केली. यातील पहिल्या कारवाईत एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक शिनगारे, पोलीस हवालदार भुजबळ, पोलीस शिपाई ठाकूर, थोरात यांनी रविवारी भटवाडीतील रामजीनगर, दत्ताजी साळवी मैदानाजवळ अब्दुल बिशेस या ५० वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला अटक केली. तो नवी मुंबईतील मच्छिमार्केट, सरसोळे गावात राहत असून चिकन विक्रेता म्हणून काम करतो. दुसर्या कारवाईत घाटकोपर पोलिसांनी जमीना हजरतअली मंडल या ४० वर्षांच्या महिलेस अटक केली. ती बांगलादेशीची नागरिक असून सध्या नवी मुंबईतील नेरुळ, सेक्टर वीस, विश्वनाथ पटेल इमारतीमध्ये राहते. त्यांच्या चौकशीतून त्यांचे अनेक नातेवाईक, मित्र मुंबईसह पनवेल, भिवंडी, कल्याण, वसई-विरार, नालासोपारा, मिरारोड परिसरात राहत असल्याचे उघडकीस आले. गेल्या चार वर्षांपूर्वी ते दोघेही बांगलादेशातून मुंबईत नोकरीसाठी आले होते. तेव्हापासून ते दोघेही मुंबई शहरात वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या बांगलादेशी नागरिकांकउून पोलिसांनी मोबाईल, सिमकार्ड आणि काही कॅश जप्त केले आहेत. बांगलादेशातील उपासमारी आणि गरीबीला कंटाळून ते सर्वजण भारतात आले होते. तेव्हापासून विविध ठिकाणी काम करत होते. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशात पाठविले जाणार आहे.