१९ लाखांच्या गांजासह महिलेस अटक

गोवंडी-देवनार पोलिसांची धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – सुमारे १९ लाखांच्या गांजासह शबाना शेहरे आलम शहा ऊर्फ शब्बो या महिलेस गोवंडी आणि देवनार पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ९४ किलो ४९४ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला आहे. शब्बोविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

परिमंडळ सहाअंतर्गत शिवाजीनगर, मानखुर्द आणि गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशा मुक्त गोवंडी अभियान राबविण्यात येत असून या मोहीमेतंतर्गत परिसरात पोलिसाकडून जनजागृती केली जात असताना ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सुरु असताना रविवारी एक महिला तिच्या राहत्या घरातून ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजू साळुंखे, सहाय्यक फौजदार संतोष कांबळे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासितअली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार अंबरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक राजू साळुंखे, अभिजीत देशमुख, सहाय्यक फौजदार संतोष कांबळे, पोलीस हवालदार आंब्रे, पोलीस शिपाई तेजस देशमुख, विशाल पाटील, सोनावणे, सूर्यवंशी, प्रियांका माने, प्रिती पवार, मयुरी पाटील यांनी शबाना शेहरे आलम शहा ऊर्फ शब्बो या ३२ वर्षांच्या महिलेस तिच्या गोवंडीतील न्यू गौतमनगर, प्लॉट क्रमांक, केजीएन सोसायटीच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते.

यावेळी तिच्या घराची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी सुमारे दहा लाखांचा पन्नास किलो गांजाचा साठा जप्त केला. तिच्या चौकशीतून तिला या गुन्ह्यांत इम्रान सादिकअली शहा आणि जायदा बानो झिल्लो इम्रान शहा हे दोघेही मदत करत होते. त्यामुळे या गुन्ह्यांत या दोघांनाही पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दुसर्‍या कारवाईत देवनार पोलिसांनी पावणेदहा लाखांचा ४४ किलो २७४ ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ९४ किलो ४९४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची किंमत १९ लाख ७८ हजार ४२८ रुपये इतकी आहे. शब्बोविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत तिला लोकलक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page