सायबर ठगांना सिमकार्ड विक्री करणार्या आरोपीस अटक
राजस्थानात ४५० हून अधिक सिमकार्डची विक्री केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मार्च २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना बोगस दस्तावेज सादर करुन मिळविलेल्या सिमकार्डची विक्री करणार्या अजय प्रल्हा बिर्हाडे या २५ वर्षांच्या सिमकार्ड विक्रेत्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. तो मूळचा जळगाव येथील अमळनेरचा रहिवाशी असून त्याने राजस्थानातील अलवार शहरात आतापर्यंत ४५० हून अधिक सिमकार्डची विक्री केली होती. या सिमकार्डचा सायबर ठग फसवणुकीसाठी वापर करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपीचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मुसा मोहीयोउद्दीन शेख हे ७२ वर्षांचे वयोवृद्ध वांद्रे येथे राहत असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. २७ डिसेंबरला त्यांना मधुकर गावित या बोगस नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करुन मॅसेज पाठविण्यात आला होता. त्यात संबंधित ठगाने त्याचा मित्र सीआरपीएफमध्ये असून त्याच्या घरातील विविध वस्तूची स्वस्तात विक्री करायची आहे. त्या वस्तू तुम्ही खरेदी करा असे सांगून या ठगाने त्यांना २७ डिसेंबर २०२३ ते १ मार्च २०२४ या कालावधीत १ लाख ७६ हजार ५०० रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्यांना संबंधित वस्तूची डिलीव्हरीची मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी समोरील व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच मुसा शेख यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या सायबर सेल पथकातील पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, पोलीस हवालदार मदन तानाजी मोरे, संतोष मंगेश पवार, पोलीस शिपाई बनसोडे, गणेश हंचनाळे (तांत्रिक मदत) यांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांना अज्ञात सायबर ठगाने बोगस सिमकार्डचा वापर करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे ते सिमकार्ड कोणाच्या नावावर होते याची माहिती काढत असताना पोलिसांना अजय बिर्हाडे याचे नाव समजले होते. या माहितीनंतर या पथकाने जळगावच्या अमलनेर, आंबेडकर भवन, फरशी रोडचा रहिवाशी असलेल्या अजयला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बोगस सिमकार्ड दिल्याचे सांगितले. त्याने आतापर्यंत ४५० हून अधिक सिमकार्डची राजस्थानच्या अलवार शहरात विक्री केली होती. याकामी त्याला त्याच्या इतर काही सहकार्यांनी मदत केली होती. तपासात ही माहिती उघड होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.