घातक शस्त्रांच्या धाकावर १.८७ कोटीच्या दागिन्यांची लूट
चारही आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – घातक शस्त्रांच्या धाकावर १ कोटी ८७ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या लूटप्रकरणी चारही आरोपींना विशेष सेशन कोर्टाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रफुल्ल रामचंद्र गायकवाड, शहानवाज बद्रुद्दीन खान, जहॉंगीर अब्दुल मलिक शेख आणि रतनकुमार श्यामनाथ सिंग अशी या चौघांची नावे असून या चौघांना अलीकडेच कोर्टाने दोषी ठरविले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा पावणेदोन कोटीचा चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
मुकेशकुमार रतनचंद संघवी हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा होलसेलमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. १७ सप्टेंबर २०१६ रोजी ते त्यांच्या दुकानातून विविध डिझाईनचे १ कोटी ८७ लाख ६० हजाराचे ६५६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन राजस्थानला जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि भाचा होते. टॅक्सीतून छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाचय दिशेने जात असातना कर्नाक बंदर येथे टॅक्सीचालकाने लघुशंकेचा बहाणा करुन टॅक्सी थांबविली होती. याच दरम्यान तिथे आलेल्या आरोपींनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून, त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने घेऊन पळून गेले होते. या घटनेनंतर मुकेशकुमार संघवी यांनी घडलेला प्रकार पायधुनी पोलिसांना सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल होताच पायधुनी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संमातर तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना पोलिसांनी चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. त्यात प्रफुल्ल रामचंद्र गायकवाड, शहानवाज बद्रुद्दीन खान, जहॉंगीर अब्दुल मलिक शेख आणि रतनकुमार श्यामनाथ सिंग यांचा समावेश होता. या आरोपीकडून पोलिसांनी १ कोटी ७५ लाख ३८ हजार रुपयांचे ६२७३ ग्रॅम वजनाचे चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. या चारही आरोपीविरुद्ध नंतर विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान ३४ साक्षीदार तपासण्यात आले होते. खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी न्या. व्ही एम सुंदळे यांनी चारही आरोपींना दोषी ठरवून दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या आरोपींना शिक्षा होण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, सहपोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर शिंदे, प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक भास्कर कदम, संतोष कदम, सहाय्यक फौजदार एकनाथ कदम, महिला पोलीस हवालदार सुलभा केंकाणे, पोलीस शिपाई गणेश सपकाळ यांनी विशेष परिश्रम घेतले होते.