बोरिवली दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदारासह तिघांना अटक
हलगर्जीपणामुळे तीन कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मार्च २०२४
मुंबई, – कार पार्किंगचे प्लॅटफॉर्मचे बांधकाम करताना सोळाव्या मजल्यावरुन पडून तीन कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी गजानन कार्पोरेशनच्या कंत्राटदारासह तिघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून या गुन्ह्यांत बुधवारी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यात कंत्राटदार सरोजकुमार चक्रपाणी सल्ला, साईट इंजिनिअर धनंजय विजय परब आणि फोरमन राहुल ऊर्फ लिटल बादल बिस्वास यांचा समावेश आहे. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना मंगळवारी १२ मार्चला सकाळी पावणेदहा वाजता बोरिवलीतील कल्पना चावला चौक, आर. एम भट्टाड मार्गावरील सोनी आर्केड इमारतीच्या बांधकाम साईटवर घडली. मंगळवारी सकाळी काही कामगार इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर कार पार्किंग प्लॅटफॉर्मचे बांधकाम करत होते. यावेळी इमारतीची परांची कोसळून पाच कामगार सोळाव्या मजल्यावरुन खाली पडले होते. यावेळी सागर गोपाळ पाईक याने वेळीच सुरक्षित ठिकाणी उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला होता. मात्र शंकर जगनाथ वैद्य, मनरंजन मंगल समद्दर आणि पियुष नेतल हल्दर या तीन कामगारांचा मृत्यू झाला तर सुशील जमुना गुप्ता हा कामगार गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना बांधकामाच्या ठिकाणी नियंत्रण आणि देखरेख करणारे गजानन कार्पोरेशनचे कंत्राटदार सरोजकुमार, साईट इंजिनिअर धनंजय परब आणि फोरमन राहुल ऊर्फ लिटल यांनी कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यांच्याच हलगजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले होते.
याप्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी धनसिंग पवार यांच्या तक्रारीवरुन बोरिवली पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी तिघांसाठी जामिनासाठी अर्ज केला होता. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींविरुद्ध ३०४ अ, ३३८ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे सांगितले.