शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्या टोळीचा पर्दाफाश
अकराजणांना लाखो रुपयांच्या महागड्या मोबाईल कारसह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – चांगला परतावा देतो असे सांगून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन अनेकांना गंडा घालणार्या एका टोळीचा डोंगरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणात आतापर्यंत तीन मुख्य आरोपीसह अकराजणांना पोलिसांनी अटक केली आहे. गौतम गोपाल दास, श्रीनिवास राजू राव, ओंकार युवराज थोरात, श्रीकांत बाळासाहेब साळुंखे, ओजस चौधरी, आकाश आत्माराम दुसारे ऊर्फ आकाश सोनार, दिनेश हिरामण तायडे, मोहम्मद राजिक सादिक पटेल, सागर धिरज कोल्हे, हर्षल प्रकाश मोरे आणि अमीत उत्तम मिटकर अशी या अकराजणांची नावे आहेत. या आरोपीकडून सोळा महागडे मोबाईल, चार लॅपटॉप, एक टँक, ५८ लाख रुपयांच्या दोन जग्वार एक्स जे आणि महिंद्रा मझारे महागड्या कार असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही टोळी नेपाळ येथे कार्यरत असलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांच्या संपर्कात होती. त्यांच्या सांगण्यावरुन विविध बँकेत खाती उघडून त्यांनी ही रक्कम या सायबर ठगांना पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार रविराज सदानंद कांबळी हे सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील डॉ. मैशेरी रोड, सौदा हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतात. १५ जुलै ते २५ जुलै २०२४ या कालावधीत त्यांना एएसएमसी नोटीफिकेशन मोबाईल क्रमांकावरुन एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविण्यात आले होते. त्यासाठी त्यांना ऍप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी विविध शेअरमध्ये सुमारे साडेआठ लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र कुठलाही परवाता तसेच मूळ रक्कम परत न करता या सायबर ठगांनी त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डोंगरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त तन्वीर शेख यांनी गंभीर दखल घेत डोंगरी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कोतमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार गौरव धादवड, पोलीस उपनिरीक्षक किशोर बच्छाव, गोविंद फड, पोलीस हवालदार साबळे, पोलीस शिपाई खैरे, गायकवाड, सुरवाडे, कचरे, तांत्रिक मदत पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी तपास सुरु केला होता. यावेळी सायबर पोलिसांनी संबंधित बँकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाली होती, त्या बँक खातेदारांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता.
या माहितीनंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन गौतम दास आणि श्रीनिवास या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर सातारा येथून ओंकार, त्याचा पुण्यात राहणारा मित्र श्रीकांत, जळगावचा ओजस या तिघांना अटक केली. तपासात या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आले होते. त्यानंतर या पथकाने नाशिक येथून आकाश, दिनेश, अमीत, भुसावळ येथून मोहम्मद राजिक, आणि पुण्यातून सागर या इतर आरेापींना अटक केली.
तपासात या टोळीने वेगवेगळ्या बँकेत खाती उघडून या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना दिली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक करणारी ही एक टोळी असून या टोळीचे मुख्य आरोपी सध्या नेपाळमध्ये वास्तव्यास आहे. याच आरोपीसाठी ही टोळी काम करत होती. यातील आकाश दुसाने, दिनेश तायडे आणि मोहम्मद राजिक यांनी नेपाळमध्ये या मुख्य आरोपीची भेट घेतली होती. त्यासाठी प्रत्येकाला ठराविक रक्कमेचे कमिशन दिले जात होते. याच पैशांतून त्यांनी महागडे मोबाईल आणि कार विकत घेतले होते. त्यांच्याकडील सर्व मोबाईल आणि महागड्या दोन्ही कार पोलिसांनी जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.