तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – माहीम येथे एका २६ वर्षांच्या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आलिया अहमद गाची असे या तरुणीचे नाव असून तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा २५ वर्षांचा प्रियकर ओवेस अब्दुल रेहमान शेख याला माहीम पोलिसांनी अटक केली. लग्नावरुन सुरु असलेल्या वादातून ओवेसकडून आलियाचा मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता, या शोषणाला कंटाळून तिने मानसिक नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शगुप्ता अन्वर शेख ही घासबाजार परिसरात राहते. मृत आलिया गाची ही तिची मैत्रिण असून ती माहीम येथील रेतीबंदरजवळील नाखवा रहिवाशी संघात भाड्याच्या रुममध्ये राहत होती. गुरुवारी सायंकाळी तिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही माहिती रुम मालकीण लक्ष्मी विनोद पागधरे हिच्याकडून मिळताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आलियाला पोलिसांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांना तिच्या गळ्याभोवती लिगेचर मार्क दिसून आले होते. तिच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नव्हती. त्यामुळे आलियाने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. त्यामुळे तिची मैत्रिण शगुप्ता शेख हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिचे ओवेस हा तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तो तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते, मात्र तो तिच्याशी लग्न करत नव्हता. लग्नावरुन त्यांच्यात वाद सुरु होते. त्यातून तिला तिला सतत मारहाण आणि शिवीगाळ करत होता. त्यामुळे आलिया ही काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला होता. या जबानीनंतर शगुप्ता शेख हिची पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती. या तक्रारीनंतर ओवेसविरुद्ध पोलिसांनी आलियाचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात ओवेस हा वडाळा येथील बीपीटी रेल्वे लाईन, गेट क्रमांक दोनमध्ये राहत असून त्याचे काही वर्षांपासून आलियासोबत प्रेमसंबंध होते.