मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – वाढदिवसानिमित्त व्हिला बुकिंगसाठी ऑनलाईन पेमेंट घेऊन एका तरुणाची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आरेापीस वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी अटक केली. अल्तमस अहमदअली शेख असे या २१ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या मोबाईलवरुन अशाच प्रकारे दहा तक्रारी दाखल असल्याचे तपासात उघडकीस आहे.
तक्रारदार वडाळा परिसरात राहत असून त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना त्यांच्या मित्रांसह नातेवाईकांना वाढदिवसाची पार्टी द्यायची होती. त्यासाठी त्यांना लोणावळा येथे एक व्हिला बुक करायचा होता. ४ फेब्रुवारीला ऑनलाईन सर्च करताना त्यांना एका वेबसाईटची माहिती दिसली होती. तिथे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने त्यांच्याकडे आगाऊ तसेच डिपॉझिटच्या पैशांची मागणी केलीी होती. त्यामुळे त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात सोळा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांनी त्यांनी त्याला संपर्क साधून व्हिलाबाबत माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित व्यक्तीचा मोबाईल बंद येत होता. वारंवार संपर्क साधूनही त्याच्याशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय शिंदे, अमोल सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सावंत, पोलीस हवालदार जाधव, पोलीस शिपाई गजभारे यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अल्तमस शेख या २१ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता.
त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने सायबर ठगांना काही मोबाईल आणि सिमकार्ड पुरविले होते. या मोबाईलवरुन ही फसवणुक झाली होती. त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल आणि चार सिमकार्ड जप्त केले आहेत. या मोबाईलची माहिती काढल्यानंतर एनसीआरपी पोर्टलवर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण दहा तक्रारी प्राप्त झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.