मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरात दहा वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने तर वडाळ्यात सतरा वर्षांच्या अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडाळा टी टी आणि मालवणी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी पित्याला अटक केली तर पळालेल्या चुलत्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत सतरा वर्षांची असून ती वडाळा परिसरात राहते. सध्या ती शिक्षण घेत असून ४२ वर्षांचा आरोपी तिचा चुलता आहे. ते दोघेही एकाच रुममध्ये राहतात. ३० जानेवारी ते ७ फेब्रुंवारी या कालावधीत घरात कोणीही नसताना त्याने तिच्याच पुतणीवर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. चुलत्याकडून सुरु असलेल्या या शारिरीक शोषणाला कंटाळून तिने हा प्रकार वडाळा टी टी पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची तिथे उपस्थित पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रार अर्जावरुन आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दुसरी घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. ३३ वर्षांची तक्रारदार महिला मालवणी परिसरात राहत असून ती घरकाम करते. तिचा पती जरीचा काम करत असून दहा वर्षांची मुलगी शाळेत जाते. शुक्रवारी दुपारी साडेबारा ते सायंकाळी सातच्या दरम्यान तिच्या घरात कोणीही नव्हती. ही संधी आरोपी पित्याने त्याच्याच दहा वर्षांच्या मुलीशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार तिने कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. सायंकाळी ही महिला घरी आली असता तिला तिच्या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती ऐकल्यानंतर तिला मानसिक धक्काच बसला होता. त्यानंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला रात्री उशिरा मालवणी परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांतील ही तिसरी घटना असून यापूर्वीही मालवणी परिसरात अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याकडून लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मालवणीत अल्पवयीन मुली स्वतच्याच घरात सुरक्षित नसल्याचे बोलले जाते.