उत्तरप्रदेशातील ड्रग्ज कारखाना पोलिसांकडून उद्धवस्त

दहा कोटीच्या ड्रग्जसह इतर मुद्देमालासह दोघांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – उत्तरप्रदेशातील ड्रग्जचा कारखाना साकिनाका पोलिसांकडून उद्धवस्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे दहा कोटीचे ड्रग्जसहीत इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अखिलेश प्रताप सिंग आणि मोहम्मद गौस ऊर्फ अहमद कुरेशी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.

गेल्या काही दिवसांत एमडीसह इतर ड्रग्ज विक्री करणार्‍या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत इस्त्राईल अब्दुल सुभान शेख, जसीम ऊर्फ चिकू शकील शेख आणि प्रदीप ऊर्फ चिकू विरेंद्र हरिजन या तिघांना साकिनाका पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी काही ड्रग्जचा साठा जप्त केला होता. त्यांच्या चौकशीतून अखिलेश याचे नाव समोर आले होते. ड्रग्ज तस्करी टोळीचा तोच म्होरक्या होता. अनेकजण त्याच्याकडून ड्रग्ज घेऊन त्या ड्रग्जची मुंबईसह नवी मुंबई शहरात विक्री करत होते. त्यामुळे अखिलेशच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना अखिलेश हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो नऊपेक्षा अधिक सिमकार्ड आणि तीन वेगवेगळ्या मोबाईलचा वापर करत असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या अटकेसाठी साकिनाका पोलिसांचे एक विशेष पथक उत्तरप्रदेशला गेले होते. मात्र मुंबई पोलिसांची माहिती मिळताच तो पळून गेला होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैसाळे, प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वणवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज परदेशी, पोलीस हवालदार चंद्रकांत पवार, खैरमोडे, पोलीस शिपाई अनिल करांडे, महिला पोलीस शिपाई गोम्स आदीचे एक पथक पुन्हा उत्तरप्रदेशला गेले होते. या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद गौस आणि अखिलेश सिंग या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनी उत्तरप्रदेशात ड्रग्जचा कारखाना सुरु केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे छापा टाकून ड्रग्जचा साठा उद्धवस्त केला होता.

या कारवाईत पोलिसांनी नऊ कोटीचा ५ किलो ५८० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, एक कोटीचे स्थायु रुपी एमडी ड्रग्ज, अठरा हजाराचे साहित्य असा दहा कोटी अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. मुंबईत आणल्यानंतर या दोघांनाही शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page