बारा वर्षांच्या मुलीचा विनयभंग करुन अश्लील व्हिडीओ काढले
विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत तरुणाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – घरी आणलेल्या एका बारा वर्षांच्या मुलीचा विनयभंग करुन तिचे कपडे काढून अश्लील व्हिडीओ काढून तिला धमकी दिल्याप्रकरणी १९ वर्षांच्या तरुणाला समतानगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह आयटी, पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
बळीत मुलगी ही कांदिवलीतील पोयसर परिसरात राहत असून एका खाजगी शाळेत शिक्षण घेते. आरोपी हा तिच्या परिचित असून ते दोघेही एकमेकांना ओळखतात. ५ डिसेंबर ते ६ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीने बळीत मुलीला त्याच्या घरी आणले होते. तिथेच त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिचे जबदस्तीने कपडे काढून मोबाईलवरुन तिचे अश्लील व्हिडीओ काढले होते. तिने विरोध केल्यानंतर त्याला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची तसेच तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
काही दिवसांपूर्वी त्याने तिचे अश्लील व्हिडीओ तिच्या काही मैत्रिणींना पाठविले होते. तो व्हिडीओ नंतर तिच्या पालकांपर्यंत पोहचला होता. याबाबत त्यांनी तिने विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला होता. त्यानंतर ते सर्वजण समतानगर पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे त्यांना उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह आयटी आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी त्याच्या कांदिवलीतील राहत्या घरातून अटक केली. त्याच्याकडून त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. चौकशीत त्याने बळीत मुलीचा विनयभंग करुन तिचे अश्लील व्हिडीओ काढून ते व्हिडीओ तिच्या मैत्रिणीला पाठविल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.