बाईक पार्क करण्यावरुन तरुणावर प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत दोन्ही हल्लेखोरांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० फेब्रुवारी २०२५
मुंबई, – बाईक पार्क करण्यावरुन झालेल्या वादातून गुरुप्रितसिंग बलजीतसिंग जंझुडा या ३० वर्षांच्या तरुणावर दोघांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात गुरुप्रितसिंग हा जखमी झाला होता. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच दोन्ही हल्लेखोरांना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. राहुल वसंत हांडे आणि रोहित मनोहर देठे अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी पोलीस पथकालाही शिवीगाळ, धक्काबुक्की करुन मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी रात्री सव्वादोन वाजता मुलुंड कॉलनीतील हिंदुस्तान चौक, हनुमानपाडा रोड, कॉसमो कॉस कंपनीसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुप्रितसिंग हा मुलुंडच्या साईनाथवाडीत राहतो. रविवारी रात्री तो त्याची बाईक पार्क करण्यासाठी कॉसमो कॉस कंपनीसमोर गेला होता. यावेळी तिथे राहुल त्याची बाईकसह उभा होता. त्याने त्याची बाईक बाजूला करण्यास सांगितले. त्यावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात राहुलसह रोहितने त्याला शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी बांबू, लोखंडी रॉड आणि दगडाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्या बाईकच्या काचा फोडून नुकसान केले. हा प्रकार समजताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी गुरुप्रितसिंग जंझुडा याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली. याच गुन्ह्यांत दोघांनाही सोमवारी मुलुंडच्या लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील राहुल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात मारामारीसह गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या गुरुप्रितसिंगवर अग्रवाल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्याच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली होती. प्राथमिक औषधोपचारानंतर त्याला घरी पाठविण्यात आले होते.