तीन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी दोघांना अटक
खार-जोगेश्वरीतील घटना; दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० फेब्रुवारी २०२५
मुंबई, – सहा ते आठ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी दोन आरोपींना खार आणि ओशिवरा पोलिसांनी अटक केली. खार आणि जोगेश्वरी परिसरात या दोन्ही घटना घडल्या असून याप्रकरणी ओशिवरा आणि खार पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
३० वर्षांची तक्रारदार महिला ही जोगेश्वरी येथे राहते. तिला आठ आणि सहा वर्षांच्या दोन मुली आहेत. तिच्याच शेजारी २३ वर्षांचा आरोपी राहत असून तो काहीच कामधंदा करत नाही. ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आरोपी हा तिच्या घरी आला होता. त्याने तिच्या दोन्ही मुलांना खाऊ देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या मोबाईवरुन अश्लील व्हिडीओ दाखवून दोन्ही मुलींशी अश्लील लैगिंक चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार नंतर दोन्ही मुलींकडून समजताच या महिलेने घडलेला प्रकार ओशिवरा पोलिसांना सांगून आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली.
दुसर्या घटनेत एका २८ वर्षांच्या डिझायनर तरुणाला खार पोलिसांनी अटक केली. आरोपी आणि तक्रारदार महिला नातेवाईक असून ही महिला वांद्रे परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला सात वर्षांची एक मुलगी आहे. १ डिसेंबर २०२४ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत त्याने तिच्या मुलीशी खेळण्याचा बहाणा करुन तिच्या प्रायव्हेट पार्टला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. रविवारी हा प्रकार उघडकीस येताच या महिलेने आरोपीविरुद्ध खार पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच डिझायनर नातेवाईक आरोपीस खार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.