मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी तसेच व्यवसायात मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोलचा पोलीस हवालदार विशाल गोविंद यादव याला मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सोमवारी अटक केली. दहा हजाराचा पहिला हप्ता घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. दरमाह दहा हजाराचा हप्ता देण्याची धमकी विशाल यादव याला चांगलीच महागात पडली आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार व्यापारी असून त्यांचा तंबाखू आणि सुपारीचा किरकोळ विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी सीबी कंट्रोलच्या आर्थिक गुन्हे शाखेचा हवालदार विशाल यादव याने त्यांची भेट घेतली होती. त्यांचा व्यवसाय सुरु ठेवण्यासह व्यवसायात मदत करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे पाच हजार रुपये गुडलक म्हणून मागितले होते. तसेच दरमाह दहा हजाराचा हप्ता द्यावा लागेल असे सांगून लाचेची रक्कम दिली नाहीतर त्यांच्यावर कारवाईची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी त्याला पाच हजार रुपये गुडलक म्हणून दिले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला पाच ते सात तारखेदरम्यान दहा हजाराची हप्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सात तारीख उलटूनही त्याने दहा हजाराचा हप्ता दिला नव्हता. त्यामुळे विशाल यादवने त्यांना फोन करुन पैशांची विचारणा केली होती. यावेळी त्याने दोन दिवसांत पैशांची व्यवस्था करतो असे सांगितले. त्यानंतर सोमवारी १० फेब्रुवारीला त्यांनी विशाल यादवविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विशाल यादवने त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने तिथे सापळा लावला होता. सोमवारी तक्रारदार दहा हजाराचा हप्ता घेऊन विशाल यादवला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण, अप्पर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर, राजेंद सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी प्रविण नावडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सोपान चिट्टमपल्ले यांनी केली.