डिलीव्हरीसाठी घेतलेल्या ७३ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
राजस्थानातात पळून गेलेल्या नोकराला मुद्देमालासह अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मार्च २०२४
मुंबई, – डिलीव्हरीसाठी घेतलेल्या सुमारे ७३ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करुन पळून गेलेल्या नोकराला काळाचौकी पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. कान्हाराम ऊर्फ प्रविण राजाराम जाट असे या नोकराचे नाव असून तो मूळचा राजस्थानच्या पालीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला भोईवाडा येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कान्हाराम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध काळाचौकीसह पार्कसाईट पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीच्या एका गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जितेंद्र परमानंद मिश्रा हे भुलेश्वर येथील आत्माराम मर्चंट रोड, भुलेश्वर दर्शन अपार्टमेंट त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा जे. के हॉल मार्किंग सेंटर नावाचे सोन्याचे दागिने हॉल मार्किंगचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे कामाला असलेले अंकित जैन व त्याचा भाऊ अंकुश जैन हे हॉल मार्किंग दागिन्यांचे काम पाहतात. लालबाग येथील चिवडा, नारायण उद्योग भवन येथे त्यांचे एक कार्यालय आहे. तिथेच चौदा कामगार कामाला असून त्यांच्या राहण्याची व्यवसाय पहिल्या मजल्यावर करण्यात आली होती. व्यापार्याकडून आलेल्या दागिन्यांवर तिथे हॉल मार्किंग करुन दिले जाते. त्यानंतर ते दागिने संबंधित व्यापार्यांना परत केले जाते. तोपर्यंत ते दागिने कंपनीच्या सुरक्षित लॉकरमध्ये ठेवले जात होते. लॉकरची चावी कामगार झोपतात त्याच गाळ्यामध्ये ठेवली जात असल्याने याबाबतची सर्व कर्मचार्यांना कल्पना होती. याच कंपनीत कान्हाराम हा चालक म्हणून काम करत होता. तो मूळचा राजस्थान्या पाली, मेवाडीचा रहिवाशी आहे. अनेकदा तो व्यापार्यांकडून दागिने आणून देणे आणि मार्किंग केलेले दागिने व्यापार्यांना परत करण्यासाठी संबंधित कर्मचार्यासोबत जात होता.
फेब्रुवारी महिन्यांत कनक शिल्प नावाच्या एका कंपनीने त्यांना सोन्याचे दागिने हॉल मार्किंगसाठी दिले होते. ते दागिने हॉल मार्किंग झाल्यानंतर लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. १० फेब्रुवारीला या दागिन्यांची डिलीव्हरी होणार होती. त्यामुळे अंकित जैन यांनी लॉकरमधून ते दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना सुमारे ७३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तिथे नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी तिथे काम करणार्या कर्मचार्याकडे चौकशी केली असता त्यांनी सकाळी पावणेदहा वाजता कान्हाराम हा कंपनीत आला होता. तो दागिने डिलीव्हरीसाठी घेऊन जातो असे सांगून तो दागिने घेऊन निघून गेल्याचे सांगितले. हा संपूर्ण प्रकार कंपनीतील सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्यामुळे अंकित जैन याने त्याला फोन केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संबंधित कंपनीत फोन करुन विचारणा केली होती, मात्र या कंपनीने त्यांना दागिने मिळाले नसल्याचे सांगितले. कान्हाराम हा डिलीव्हरीसाठी दागिने घेऊन जातो असे सांगून सुमारे ७३ लाख रुपयांचे दागिने चोरी करुन पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच जितेंद्र मिश्रा यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर कान्हाराम हा एका टॅक्सीतून तेथून जाताना दिसून आला होता. त्याने मोबाईलमधून सिमकार्ड काढून फेंकून दिले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा नवीन मोबाईल क्रमांक प्राप्त केला होता. त्याचे सीडीआर काढल्यानंतर तो राजस्थानला पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल माने, पोलीस हवालदार परब, चव्हाण, शिंदे, निकम यांचे पथक राजस्थानला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुपसिंग मीना, देवनार पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक धोडके, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद नानेकर यांच्या मदतीने त्याचा शोध सुरु केला होता. त्याच्यावर मागावर असताना कान्हाराम दर दहा दिवसांनी मोबाईल आणि सिमकार्ड बदलत होता. एकाच ठिकाणी चार दिवसांपासून जास्त दिवस राहत नव्हता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने ही चोरी केल्याची कबुली देताना पोलिसांकडे चोरीचे सर्व दागिने स्वाधीन केले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. कान्हारामविरुद्ध तीन वर्षांपूर्वी पार्कसाईट पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.