मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मंदिरात जाताना भरवेगात जाणार्या एका बाईकच्या धडकेने ६५ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. बिंदेश्वर रामअनुग्रह पंडित असे या मृत वयोवृद्धाचे नाव असून अपघाप्रकरणी पिऐरे अब्रांचेस या २२ वर्षांच्या बाईकस्वार तरुणाविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हा अपघात शनिवारी रात्री नऊ वाजता गोरेगव येथील लिंक रोड, कलापूर्णम शोरुमच्या दक्षिण वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वंदना बिंदेश्वर पंडीत ही तरुणी इंटेरियल डिझायनर असून ती तिची आई मिना आणि वडिल बिंदेश्वर यांच्यासोबत गोरेगाव येथील मोतीलाल नगर परिसरात राहते. तिला सत्यम नावाचा एक मोठा भाऊ असून तो सध्या अमेरिकेत कामाला आहेत. शनिवारी रात्री तिने तिच्या आई-वडिलांसोबत जेवण केले. जेवणानंतर तिचे वडिल बिंदेश्वर हे जवळच असलेल्या संस्कारधाम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराच्या दिशेने जात असताना कलापूर्णम शोरुमच्या दक्षिण वाहिनीवर त्यांना एका भरवेगात जाणार्या बाईकस्वाराने धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना बाईकस्वारासह इतरांच्या मदतीने रिक्षातून जवळच्या प्रार्थना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तिथे उपचार सुरु असताना पहाटे पावणेचार वाजता त्यांचे निधन झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी वंदना पंडित हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाईकस्वार पिऐरे अंब्रासेस याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अंधेरीतील मनिष शॉपिंग सेंटरजवळील मनिषनगर, मनिष चैताली अपार्टमेंटमध्ये राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.