मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या केवळ संशयावरुन विकास सुभाष पासी या २० वर्षांच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीसह त्याच्या मित्राला विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून जन्मठेप सश्रम कारावासासह दोन हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. चेतन बाळू तिकोने आणि अक्षय दत्ताराम गायकवाड अशी या दोघांची नावे आहेत. अलीकडेच या खटल्याची पूर्ण झाली आणि कोर्टाने हा निकाल दिला.
ही घटना १६ जून २०२१ रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता काळाचौकी येथील भैय्यावाडी, प्रसन्न क्लिनिकसमोर घडली. याच परिसरातील परशुराम नगर परिसरात विकास पासी हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. चेतनला त्याच्या पत्नीचे विकाससोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातून त्याने त्याला धडा शिकविण्यासाठी योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे १६ जूनला चेतन हा त्याचा मित्र अक्षयसोबत प्रसन्न क्लिनिकसमोर आला, तिथेच त्याने विकास पासीसोबत वाद घातला. या वादानंतर या दोघांनी त्याच्यावर लोखंडी पट्टीसह तिक्ष्ण हत्याराने वार केले होते, त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता, जखमी झालेल्या विकासला नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मृत विकासचा भाऊ आनंद सुभाष पासी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन काळाचौकी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता,
गुन्हा दाखल होताच चेतन तिकोने आणि अक्षय गायकवाड या दोघांनाही काही तासांत पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपास प्रविण कुयेस्कर यांच्याकडे होता. त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करुन या पुराव्यासह सीए रिपोर्ट आणि इतर तांत्रिक पुरावे विशेष सेशन कोर्टात आरोपपत्रासोबत सादर करण्यात आले होते. या खटल्यात सोळा साक्षीदार तपासले गेले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी न्या. एन. पी त्रिभुवन यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरविले होते. त्यानंतर त्यांना जन्मठेप सश्रम कारावासासह दोन हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या गुन्ह्यांत पोलीस निरीक्षक प्रविण कुयेस्कर यांनी सबळ पुरावे प्राप्त करुन विशेष कोर्टात आरोपपत्र सादर केले तर सरकारी वकिल म्हणून रंजना बुधवंत यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट स्टाफ-पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा गायकवाड, पोलीस हवालदार उत्तम आंग्रे, समीर तावडे आणि महिला पोलीस हवालदार जान्हवी चव्हाण यांनी कोर्ट कामकाजामध्ये विशेष मदत केली होती.