मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – क्रेडिट पॉईटच्या नावाने एका २१ वर्षांच्या कॉलेज तरुणीची अज्ञात सायबर ठगाने ४ लाख ५७ हजाराची फसवणुक केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध वाकोला पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तक्रारदार तरुणी ही भारतीय सैन्यातील एका कॅप्टनची मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
२१ वर्षांची तरुणी सांताक्रुजच्या कालिना, मिलिटरी कॅम्प परिसरात तिच्या आई-वडिलांसोबत राहते. तिचे वडिल भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर काम करतात तर ती सध्या बीकॉमच्या शेवटच्या वर्षांत शिक्षण घेत आहे. २० जानेवारीला तिला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठविला होता. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. २७ जानेवारीला तिने मॅसेज पाहिला होता. त्यात एक लिंक होती. ही लिंक गुगलवर कॉपी केल्यानंतर तिला एक कोड मिळाल होता. त्यानंतर तिला कल्याणी नावाच्या एका महिलेने संपर्क साधून तिला पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते, त्यात तिच्यासह पाचजणांचा समावेश आहे. त्यानंतर तिला काही टास्क देण्यात आले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर तिला प्रत्येक टास्कमागे पन्नास रुपये मिळणार होते. त्यानंतर तिला काही रक्कम भरुन टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले.
तिने चार हजार रुपये जमा करुन तिचा टास्क पूर्ण केला होता. यावेळी तिच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा झाले होते. त्यामुळे तिला तिच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर तिला विविध टास्कसाठी सुमारे अडीच लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. यावेळी तिला आणखीन दोन लाखांचे टास्क पूर्ण करण्यास सांगण्यात आले. तिचे क्रेडिट पॉईट कमी असल्याने ते टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले. त्यामुळे तिने आणखीन पैसे गुंतविले होते. ४ लाख ५७ हजार रुपये ट्रान्स्फर करुनही तिला मूळ रक्कमेसह परतावा मिळाला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा वाकोला पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.