मोबाईल ब्लॉक केला म्हणून २३ वर्षांच्या तरुणीला धमकी
घातक शस्त्रे घेऊन माजी कर्मचारी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मोबाईल ब्लॉक केला म्हणून एका २३ वर्षांच्या तरुणीला तिच्या कार्यालयात घुसून अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी घातक शस्त्रे घेऊन आलेल्या माजी कर्मचारी दिपक आर्या या मित्राविरुद्ध कांदिवली पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तक्रारदार तरुणी ही मालाड येथे तिच्या आई-वडिलांसोबत राहते. ती कांदिवलीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ही कंपनीत मुंबईतील तारांकित हॉटेलसाठी वेटर्स, हाऊसकिपिंग, सिक्युरिटी पुरविण्याचे काम करते. कंपनीत येणार्या उमेदवारांची मुलाखत घेणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे तसेच त्यांची नेमणूक करणे आदी कामाची जबाबदारी तिच्यावर आहे. दिपक आर्या हा उत्तराखंडच्या नैनिताळचा रहिवाशी असून तो मार्च २०२४ रोजी तिथे सुपरवायझर म्हणून कामाला लागला होता. एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. सहा महिने काम केल्यानंतर दिपक हा नोकरी सोडून त्याच्या नैनिताल येथील गावी निघून गेला होता. तरीही ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.
काही दिवसांनी तो तिचा मानसिक शोषण करु लागला होता. त्यामुळे तिने त्याचा मोबाईल ब्लॉक केला होता. सोमवारी १० फेबुवारीला ती नेहमीप्रमाणे तिच्या कामावर आली होती. याच दरम्यान तिथे दिपक आला आणि त्याने तिला अश्लील शिवीगाळ करुन त्याचा मोबाईल ब्लॉक म्हणून वाद घालू लागला होता. यावेळी तिने त्याला ऑफिसच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यावरुन त्याने तिला शिवीगाळ करुन जोरात धक्का दिला होता. यापुढे त्याचा कॉल घेतला नाहीतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास परिणाम वाईट होईल असे बोलून तो निघून गेला.
या घटनेनंतर ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगितला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी तिची जबानी नोंदवून घेतली होती. त्याने आणलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात पोलिसांना एक बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे सापडले. या घटनेनंतर दिपकविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगणे, कार्यालयात घुसून कर्मचारी तरुणीला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.