मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – झोपडपट्टी कटींगमध्ये एसआरएचा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका आरोग्यसेविका महिलेची दोन बंधूंनी फसवणुक केल्याचा प्रकार गोवंडीतील देवनार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपी बंधूंविरुद्ध रुमचे बोगस ऍलोटमेंट लेटर देऊन महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेंद्र प्रशांत मोरे आणि सुशांत प्रशांत मोरे अशी या दोन बंधूंची नावे असून या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
३८ वर्षांची तक्रारदार महिला पूनम विश्वजीत कदम ही गोवंडीतील देवनार म्युनिसिपल कॉलनीत राहते. तिचे पती आजारी असल्याने ती बैंगनवाडी, शिवाजीनगर परिसरातील महानगरपालिकेत आरोग्यसेविका म्हणून काम करते. सात वर्षांपूर्वी तिची त्याच परिसरात राहणार्या योगेंद्र मोरेशी ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दोन वर्षांनी त्याने तिला मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परिसरातील काही झोपडपट्टी तोडण्याचे काम सुरु आहे. तिथेच तिला एसआरएतर्ंगत कटींगमधील एक फ्लॅट मिळवून देतो. त्याची महानगरपालिके चांगली ओळख असून काही अधिकार्यांच्या मदतीने तिला तिथे घर मिळेल असे सांगितले होते. तिला घराची गरज असल्याने तसेच योगेंद्रने तिला स्वस्तात एसआरएच्या घराचे आमिष दाखविल्याने तिने त्याल होकार दिला होता. त्यासाठी तिने त्याला २०२२ पर्यंत टप्याटप्याने कॅश स्वरुपात सात लाख रुपये दिले होते.
काही दिवसांनी योगेंद्रचा भाऊ सुशांतने तिला महानगरपालिकेकडून तिला घर देण्यात आले असून या घराचे ऍलोटमेंट दिले होते. तिचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी तिला महाराष्ट्रनगरातील एसआरए इमारतीचा एक रुम दाखविला होता. मात्र काही दिवसांनी या रुममध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगून तो त्यांना दुसरा रुम दाखवत होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याने तिला काही रुम दाखविले, मात्र रुमचा ताबा दिला नाही. याच दरम्यान महाराष्ट्रनगरातील एसआरए रुममध्ये काही लोकांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता, या सर्वांना तेथून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने त्यांच्याकडे रुमबाबत विचारणा केली, रुम मिळत नसेल तर त्यासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता.
मात्र या दोन्ही बंधूंनी तिला रुम दिला नाही किंवा पैसेही परत केले नाही. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. त्यानंतर तिने रुमच्या ऍलोटमेंटबाबत चौकशी केली असता तिच्याकडे असलेले ऍलोटमेंट लेटर बोगस असल्याचे तिला समजले. या दोघांनी स्वस्तात एसआरएचा फ्लॅट देतो असे सांगून तिची फसवणुक केली होती. तसेच पैशांची मागणी केल्यानंतर तिला धमकी दिली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने देवनार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर योगेंद्र आणि सुशांत मोरे या दोघांविरुद्ध कट रचून बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.