मूव्हर्स ऍण्ड पॅकर्सचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन फसवणुक
तीस लाखांचे घरगुती सामानासह बीएमडब्ल्यू कार घेऊन सहाजणांचे पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – मूव्हर्स ऍण्ड पॅकर्सचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन एका महिलेची सहाजणांच्या एका टोळीने फसवणुक केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. सुमारे तीस लाखांचे घरगुती सामानासह बीएमडब्ल्यू कार घेऊन या टोळीने पलायन केले आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन खार पोलिसांनी पळून गेलेल्या सहाही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नेहा विजय वैद्य ही ४१ वर्षांची महिला वांद्रे येथे तिच्या पती आणि दोन मुलांसोबत राहते. तिचे कुटुंबिय मुंबईतून बंगलोर शहरात शिफ्ट होणार होते. त्यासाठी तिने अग्रवाल मूव्हर्स ऍण्ड पॅकर्स यांना फोन केला आहे. यावेळी तिच्या मोबाईलवर गीता मूव्हर्स ऍण्ड पॅकर्सचा एक मॅसेज आला होता. तिने त्यांच्याकडे कोटेशनची माहिती विचारला असता त्यांनी तिला घरगुती सामानासाठी ३५ हजार आणि बीएमडब्ल्यू कारसाठी पंधरा हजार असे ५५ हजाराचे कोटेशन दिले होते. त्यामुळे तिने त्याला होकार दिला होता. ठरल्याप्रमाणे १५ जानेवारीला सकाळी सव्वाअकरा वाजता गीता मूव्हर्स ऍण्ड पॅकर्सचे सहा कर्मचारी तिच्या वांद्रे येथील राहत्या घरी आले होते. त्यांनी तिच्या घरातील घरगुती वस्तू, डबल डोअर फ्रिज, वॉशिंग मशिन, ड्रायर, मायक्रोवेव्ह, क्रोकरी, खेळणी, कपडे, पुस्तके आणि इतर वस्तू पॅक करुन टेम्पोमध्ये ठेवले होते. एक व्यक्ती तिची बीएमडब्ल्यू कार ड्राईव्ह करुन बंगलोर येथे घेऊन जाणार होता.
१९ जानेवारीला त्यांच्या सामानाची तिथे डिलीव्हरी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र एक आठवडा होऊन त्यांचे सामान बंगलोरला आले नव्हते. त्यामुळे गीता पॅकर्सच्या मोबाईलवर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने तिच्याकडे २ लाख ३० हजाराची मागणी केली. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने चौकशी सुरु केली असता कुठलेही मूव्हर्स ऍण्ड पॅकर्स कर्मचारी ड्राव्ईह करुन कार घेऊन जात नाही. त्यांच्याकडे कंपनीचे कर्मचारी आले नव्हते. गीता मूव्हर्स ऍण्ड पॅकर्सचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन दुसर्या व्यक्तींनी तिच्या घरातील सामानासह कार घेऊन पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच तिने घडलेला प्रकार खार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत खार पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वांद्रे परिसरात उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.