मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ मार्च २०२४
मुंबई, – सुमारे ६४ लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार बीकेसी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाबूभाई जसानी आणि संजय नावडिया अशी या दोन ब्रोकरविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या या दोघांचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पूनाभाई वल्लभभाई चांदपारा हे हिरे व्यापारी असून ते सांताक्रुज येथे राहतात. त्यांची बीकेसी येथील भारत डायमंड बोर्समध्ये उगम इंपेक्स नावाची एक कंपनी असून या कंपनीतून ते हिर्यांची खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. यातील संजय हा संजय डायमंड कंपनीचा मालक असून सध्या तो ब्रोकर म्हणून काम करतो. ते संजयला गेल्या दहा वर्षांपासून तर अन्य एक ब्रोकर बाबूभाई यांना वीस वर्षांपासून ओळखतात. यापूर्वी त्यांनी या दोघांसोबत हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याने त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता. १० जानेवारी २०२४ रोजी एका ग्राहकाला विक्रीसाठी त्यांनी त्यांच्याकडून ६४ लाख २४ हजार रुपयांचे हिरे दिले होते. या हिर्यांच्या विक्रीतून त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून ते दोघेही तेथून निघून गेले होते. दहा ते पंधरा दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी एक महिना उलटूनही पेमेंट केले नव्हते. त्यामुळे त्यांनी या दोघांनाही फोन केला होता. मात्र ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
काही दिवसांनी त्यांनी हिर्यांची विक्री झाली असून अद्याप पेमेंट मिळाले नसल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी स्टॅम्प पेपर त्यांना पेमेंटबाबत लिहून दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी हिरे परत केले नाही किंवा पेमेंट केले नव्हते. या दोघांकडून नंतर प्रतिसाद मिळणे बंद झाल्याने पूनाभाई चांदपारा यांनी बीकेसी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बाबूभाई जसानी आणि संजय नावडिया या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही ब्रोकर पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.