घटस्फोटीत व विधवा महिलांची फसवणुक करणार्या लखोबाला अटक
महिलेशी लग्न करुन दागिने पळविले; इतर महिलाही संपर्कात होत्या
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – लग्न जुळविणार्या संकेतस्थळावर लग्नासाठी इच्छुक असलेल्या घटस्फोटीत व विधवा महिलांना टार्गेट करुन, त्यांच्याशी मैत्री करुन विश्वास संपादन करुन लग्नाचे आमिष दाखवून फसवणुक करणार्या एका लखोबाला गजाआड करण्यात दिडोंशी पोलिसांना यश आले आहे. प्रमोद गंगाधर नाईक असे या ५१ वर्षीय आरोपी लखोबाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रमोदने अलीकडेच एका ४८ वर्षांच्या विधवा महिलेशी लग्न करुन तिच्याकडील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. त्याच्याकडून तीस तोळ्याचे सुमारे सोळा लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. त्याच्या चौकशीत तो इतर काही घटस्फोटीत तसेच विधवा महिलांच्या संपर्कात असल्यासचे उघडकीस आले असून या सर्व महिलांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.
तक्रारदार महिला ही विलेपार्ले येथे राहत होती. तिच्या पतीचे निधन झाले असून तिला एक मुलगी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत तिच्या मुलीचे लग्न झाले होते. त्यानंतर ती एकटी राहू लागली. त्यामुळे तिच्या मुलीने तिला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. इतकेच नव्हे तर तिची माहिती एका लग्न जुळविणार्या संकेतस्थळावर अपलोड केली होती. याच संकेतस्थळावर तिची प्रमोद नाईकशी ओळख झाली होती. त्याने त्याच्या पत्नीसह मुलांचे कोरोना काळात निधन झाले होते. तेव्हापासून तो एकटाच राहत असून नातेवाईकांच्या आग्रहखातर तो दुसरे लग्न करत असल्याची बतावणी केली होती. तिच्याशी मैत्री करुन चॅटवर संभाषण करुन त्याने तिचा विश्वास संपादन केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या दोघांनी डिसेंबर २०२४ रोजी लग्न केले होते. लग्नानंतर ते दोघेही गोरेगाव येथे राहण्यासाठी आले होते. सर्व काही ठिक सुरु असताना जानेवारी २०२५ रोजी प्रमोद हा तिचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला होता. हा प्रकार समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत दिडोंशी पोलिसांना आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटावार, सहाय्यक फौजदार रणशिवरे, पोलीस हवालदार बोराटे, चव्हाण, संबरेकर, पाटील, गायकवाड यांना प्रमोद हा पुण्यात लपला असल्याची माहिती समजली होती. या माहितीनंतर या पथकाने पुण्यातून प्रमोदला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली देताना तक्रारदार महिलेचे दागिने विक्री करण्यासाठी पुण्यात आल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी तीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्याची किंमत सोळा लाख रुपये इतकी आहे. अटकेनंतर त्याला पुण्यातून मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात प्रमोद हा गिरगाव येथे राहत असून तो विवाहीत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने त्याच्या पत्नीला सोडले होते. त्यानंतर त्याने लग्न जुळविणार्या संकेतस्थळावर स्वतची माहिती अपलोड केली होती. ४५ ते ५५ वयोगटातील घटस्फोटीत आणि विधवा महिलांना टार्गेट करुन तो त्यांच्याशी मैत्री करुन त्यांचा विश्वास संपादन करत होता. लग्नाचे आमिष दाखवून या महिलांची फसवणुक करुन तो पळून जात होता. त्याच्या संपर्कात अशाच प्रकारे तीन ते चार महिला असल्याचे तपासात उघडकीस आले. या सर्व महिलांना त्याने लग्नाचे आमिष दाखविले होते. या महिलांची नावे पोलिसांना समजली असून त्यांची लवकरच पोलिसांनी जबानी नोंदविली जाणार आहे. त्यांनी प्रमोदविरुद्ध तक्रार केल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्याला या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.