मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – न्यू इंडिया सहकारी बँकेतील १२२ कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता याच्या अटकेनंतर विकासक धर्मेश जयंतीलाल जैन याला शनिवारी रात्री उशिरा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. या दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी हितेश मेहता आणि धर्मेश जैन या दोघांनाही न्यायालयाने शुक्रवार २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हितेशने धर्मेशला ७० कोटी ५० लाख रुपये दिल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्यातील हा व्यवहार, कधी, कुठे आणि कशासाठी झाला याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. तसेच या संपूर्ण घोटाळ्यात हितेशला बँकेतील इतर कोणी मदत केली आहे का याचाही पोलीस तपास करणार आहेत. दरम्यान या गुन्हयांत उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
न्यू इंडिया सहकारी बँक लिमिटेडच्या व्यवहारात गेल्या काही महिन्यांत प्रचंड अनियमितता दिसून आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना कोणत्याही शाखेतून पैसे काढता येत नव्हते. ही घटना ताजी असतानाच या बँकेत १२२ कोटीचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बँकेचे ऍक्टिंग चिट अकाऊटींग अधिकारी देवर्षि शिरीरकुमार घोष यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तपासात हितेश मेहता हा बँकेत महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. १ जानेवारी २०२० ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत त्याने बँकेतील १२२ कोटीचा अपहार केला होता. गोरेगाव आणि प्रभादेवी येथील तिजोरीतून या रक्कमेचा अपहार करुन त्याने त्याच्या कुटुंबियासह नातेवाईकांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती.
२०१९ पासून या अपहाराच्या घटनेला सुरुवात झाली होती. २०१९ ते २०२५ या कालावधीत हितेशने गोरेगाव अणि प्रभादेवी येथील बँकेच्या शाखेतून टप्याटप्याने १२२ कोटीची अपहार केला होता. हा प्रकार ऑडिटदरम्यान उघडकीस आला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौकशीत त्याचे विकासक धर्मेश जैन याच्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले होते. त्याने धर्मेशला मे ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ७० कोटी तर २०२५ साली ५० लाख रुपये दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. या माहितीनंतर पोलिसांनी धर्मेश जैनला रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी होणार असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या गुन्ह्यांत त्यांना इतर कोणी मदत केली आहे का, हितेशने प्रभादेवी आणि गोरेगाव येथील शाखेतून १२२ कोटी काढले होते. याकामी त्याला बँकेतील कर्मचारी किंवा अधिकार्यांनी मदत केली का. धर्मेशला ७० कोटी ५० लाखांची रक्कम कशासाठी आणि कधी देण्यात आली याचाही पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्यांत उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई याचे नाव समोर आले असून त्याचा या गुन्ह्यांत काय संबंध आहे याचा तपास करुन त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.