घातक शस्त्रांसह उत्तप्रदेशातील दोन तरुणांना अटक
तीन देशी पिस्तूल, मॅगझीन व आठ काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – घातक शस्त्रांसह उत्तरप्रदेशातील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. जिशान जमील अहमद आणि दिनेकुमार महेंद्र पाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी तीन बनावटीचे पिस्तूल, तीन मॅगझीन, आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांची विक्री केली जात होती. या शस्त्रांचा मुंबई शहरात होणार्या विविध गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा शस्त्र तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध मुुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच सायन येथील प्रतिक्षानगर बेस्ट डेपो, गेट क्रमांक चारजवळ काही तरुण घातक शस्त्रांची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार शरद तुकाराम शिंदे यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता गेट क्रमांक चारजवळ दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटत होती, ते दोघेही कोणाची तरी वाट पाहत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत जिशानकडून दोन देशी बनावटी पिस्तूल मॅगझीनसह तसेच दिनेशकुमारकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह आठ जिवंत काडतुसे सापडले.
तपासात ते दोघेही उत्तरप्रदेशच्या पिलीभीत, शाही गावचे रहिवाशी आहेत. ते दोघेही मुंबई शहरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी आले होते, मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ती शस्त्रे कोणी दिली, ते शस्त्रे कोणाला विकणार होते. त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.