मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरवेगात जाणार्या एका ट्रक ट्रेलरच्या धडकेने एका ५६ वर्षांच्या शिक्षिकेचा मृत्यू झाला. निता नितीन धोंगडे असे या मृत शिक्षिकेचे नाव असून अपघातानंतर ट्रक ट्रेलरचा चालक घटनास्थळाहून पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. निता घोंगडे यांच्या अपघाती निधनाने स्थानिक रहिवाशांसह शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजता जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, काजूपाडा जंक्शन, टेक बे सेंटरसमोर झाला. ६० वर्षांचे नितीन जीवनदास धोंगडे हे मालाड येथील ऑर्लेम, डॉमनिक कॉलनीतील रेखा अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी निता ही जोगेश्वरीतील एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे. त्यांच्याकडे एक होंडा कंपनीची युनिकॉर्न बाईक असून याच बाईकवरुन ते त्यांच्या पत्नीला नेहमीच शाळेत सोडण्यासाठी आणि सायंकाळी घरी आणण्यासाठी जात होते. सोमवारी सकाळी पावणेसात वाजता ते नितासोबत त्यांच्या बाईकवरुन शाळेत सोडण्यासाठी जात होते. सकाळी सात वाजता ही बाईक काजूपाडा जंक्शनजवळ येताच मागून भरवेगात जाणार्या एका ट्रक टेलरने त्यांच्या बाईकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात त्याने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात त्यांसची पत्नी निता ही बाईकवरुन खाली पडली आणि ट्रक ट्रेलरच्या मागच्या टायरखाली आली होती.
अपघातात तिच्या डोक्यासह चेहर्याचा चेंदामेदा झाला होता. तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर चालक ट्रेलर तिथेच टाकून पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात मृत झालेल्या निता हिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनानासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी नितीन धोंगडे यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने ट्रक ट्रेलर चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर चालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.