पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच तटरक्षण दलाच्या दोन कर्मचार्यांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ मार्च २०२४
मुंबई, – शेजारीच राहणार्या एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन तटरक्षक दलाच्या कर्मचार्यांनी सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपीना पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
पिडीत पंधरा वर्षांची मुलगी तिच्या आई-वडिल, लहान भाऊ आणि बहिणीसोबत पवई परिसरात राहते. ती सध्या दहावीत शिकत असून तिच्या पालकांनी तिच्यासाठी एक खाजगी शिकवणी सुरु केली होती. तिच्याच शेजारीच ३० वर्षांचा आरोपी त्याच्या पत्नीसोबत राहतो. एकाच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित होते. १७ ऑक्टोंबरला त्यांच्या कॉलनीत एक कार्यक्रम होता. त्यामुळे मुलीची आई, बहिण, भाऊ आणि आरोपीची पत्नी कार्यक्रमासाठी गेली होती. क्लासमधून सायंकाळी घरी आल्यानंतर पिडीत मुलगी एकटीच घरी होती. यावेळी तिच्याकडे आरोपी आला आणि त्याने पत्नीचे काम असल्याचा बहाणा करुन तिला त्याच्या घरी नेले. यावेळी त्याच्या घरी त्याचा एक मित्र होता. या दोघांनी तिला बेडरुममध्ये आणून तिच्यावर जबदस्तीने सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता. तिला जिवे मारण्याची धमकी देत हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगितले होते. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती.
बदनामीसह जिवे मारण्याच्या धमकीमुळे तिने सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला होता. मात्र घडलेल्या प्रकारामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. तिची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यामुळे तिला नौदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु होते. तरीही या दोघांकडून तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरुच होता. घडलेला प्रकार तिच्या मनातून जात नसल्याने तिने तिच्या पालकांना ही माहिती सांगितली होती. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाच जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार कोणालाही सांगू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तटरक्षक दलाकडे दोन्ही आरोपींची तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींची विभागीय चौकशी सुरु केली होती. त्याचा अहवाल नंतर वरिष्ठांना देण्यात आला होता. त्यानंतर या अधिकार्यांनी पिडीत मुलीच्या पालकांना पवई पोलिसांत तक्रार करण्याच सल्ला देत त्यांना हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
या घटनेनंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध सामूहिक लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही तटरक्षक दलाच्या कर्मचार्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.