गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी आर्थिक मदतीच्या नावाने फसवणुक
फ्लॅटसाठी १४ लाख ५५ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ मार्च २०२४
मुंबई, – गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी आर्थिक मदतीची विनंती करुन त्यामोबदल्यात फ्लॅट विक्रीचे आश्वासन देऊन एका व्यक्तीची १४ लाख ५५ हजाराची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोरिवली कोर्टाच्या आदेशानंतर चारकोप पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी मेहुल अशोक मरोलिया या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपीची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
४५ वर्षांचे तक्रारदार मिरारोड येथे राहत असून इलेक्ट्रीशियन-टेक्निशियन म्हणून काम करतात. ऑगस्ट २०१९ रोजी त्यांची मेहुलशी ओळख झाली होती. त्याच्या मालकीचा कांदिलीतील ओल्ड लिंक रोड, म्हाडा एकतानगर, मालवणी-कलादर्शन इमारतीमध्ये एक फ्लॅट आहे. या फ्लॅटसाठी त्याने एका बँकेतून गृहकर्ज घेतले होते, मात्र कर्जाची परतफेड करता येत नसल्याने बँकेने त्याच्या फ्लॅटची जप्तीची प्रक्रिया सुरु केली होती. त्यामुळे त्याने त्यांना पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. कर्ज फेडल्यानंतर तोच फ्लॅट त्याने त्यांना २५ लाखांमध्ये देण्याचे मान्य केले होते. हा सौदा चांगला वाटल्याने त्यांनी त्याला टप्याटप्याने १४ लाख ५५ लाख रुपये दिले होते. काही दिवसांनी त्याने कर्जाची परतफेड करुन त्यांना फ्लॅटचे कागदपत्रे व सोसायटी एनओसी मिळवून दिली होती. मात्र तो फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी बोरिवलीतील लोकल कोर्टात न्यायालयात एक याचिका दाखल करुन मेहुल मरोलियाविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी देताना कोर्टाने चारकोप पोलिसांना आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तक्रारदाराची जबानी नोंदवून मेहुल मरोलियाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.