मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – मागणीनुसार ग्राहकांसोबत मुली पाठवून सेक्स रॅकेट चालविणार्या महिलेस पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली असून दोन्ही तरुणींना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत रोहिणी या महिलेविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुर्ला येथे राहणारी रोहिणी नावाची एक महिला सेक्स रॅकेट चालवते. तिच्या संपर्कात काही तरुणी असून या तरुणींच्या मदतीने ती त्यांना ग्राहकासोबत पाठवत असल्याची माहिती पार्कसाईट पोलिसांना मिळाली होती. या माहितीची पोलिसांकडून बोगस ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा करण्यात आली होती. या बोगस ग्राहकाने तिला संपर्क साधून काही तरुणींना घेऊन घाटकोपर येथील एलबी मार्ग, स्पाईस अॅण्ड कोर्ट किचन हॉटेलमध्ये बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता रोहिनी ही दोन तरुणीसोबत तिथे आली होती. यावेळी तिचे बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे, भापकर, महिला पोलीस उपनिरीक्षक भिसे, सदाशिव, सहाय्यक फौजदार मोमीन, पोलीस शिपाई गायकवाड, कोल्हे, कापसे यांनी तिथे छापा टाकून रोहिनीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तिच्या तावडीतून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. त्यांच्या चौकशीत रोहिनी दलाल म्हणून काम करत असून ती ग्राहकांसोबत त्यांना शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे सांगितले. ग्राहकांकडून मिळालेली काही रक्कम त्यांना देऊन उर्वरित रक्कम ती स्वतजवळ ठेवत होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर रोहिनीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिला नंतर अटक केली. अटकेनंतर तिला शुक्रवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या दोन्ही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी चार मोबाईल जप्त केले आहेत.